…तर उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते : नारायण राणे

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसची साथ सोडत नारायण राणे यांनी भाजपची वाट धरली आणि शिवसेनेचा विरोध असून देखील भाजपकडून आपल्या मुलाला विधानसभेची निवडणूक लढायला लावली. मात्र विधानसभेच्या निकालानंतर शिवसेनेने विरोधकांशी हात मिळवणी करत सरकार स्थापन केले. मात्र या सरकारला कोणतीही विचारधारा नाही. केवळ मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांनी ही आघाडी केली असल्याची घणाघाती टीका नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.

विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात सुरु आहे. नारायण राणे यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते अशा शब्दात राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे. तसेच सुरु असलेल्या अधिवेशनाबाबत बोलताना यंदा नेहमीप्रमाणे अधिवेशन असल्यासारखे वाटत नसल्याचे देखील राणे यांनी सांगितले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारधारा शिवसेनेपेक्षा वेगळी आहे. केवळ सत्तेसाठी हे तीनही पक्ष एकत्र आले आहेत. राज्याला जर चांगला मुख्यमंत्री मिळाला नाही तर महाराष्ट्र अधोगतीकडे जाईल असे देखील यावेळी नारायण राणे म्हणाले. सरकार स्थापन झाल्यापासून एक अधिवेशन संपायला आले तरी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अजून झालेला नाही असे सांगत नारायण राणे यांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/