नारायण राणेंची नवी भविष्यवाणी, सांगितले ‘या’ तारखेला कोसळेल ठाकरे सरकार

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात एकिकडे सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने (ED) शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांना नोटीसा बजावल्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. तर दुसरीकडे भाजपचे (BJP) नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी पुन्हा एकदा राज्यातील ठाकरे सरकार (Thackeray Government) कधी कोसळणार याचा मुहूर्त शोधून काढला आहे. राणे यांनी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात हे सरकार दिसणार नाही, असा दावा केला आहे.

सिंधुदुर्गात पत्रकारांशी बोलताना नारायण राणे यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा राज्यातील ठाकरे सरकार कोसळण्या संदर्भात भाकीत वर्तवले आहे. ते म्हणाले, पालकमंत्री आणि खासदार यांचं काहीही ऐकू नका, सध्या ते तात्पुरते आहेत. लवकरच ते लांब रजेवर जाणार आहेत. मार्चनंतर ठाकरे सरकार दिसणार नाही, असं भाकीत राणे यांनी वर्तवलं आहे.

नारायण राणे यांनी राज्यात ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक वेळा हे सरकार कोसळणार असल्याचे भाकीत वर्तवले होते. राज्यात महाविकास आघाडी तयार झाली त्यानंतर त्यांनी हे सरकार 11 दिवसांत कोसळेल अशी भविष्यवाणी केली होती. मात्र, त्यांचा हा मुहूर्त त्यावेळी साफ खोटा ठरला होता. त्यांनंतर त्यांनी पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्यात सरकार कोसळेल असे म्हटले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी मार्चची डेडलाईन दिली आहे. राणे यांच्या भविष्यवाणीला शिवसेना कशा पद्धतीने प्रत्युत्तर देते हे पहावे लागेल.