युती तुटल्यानंतर पहिल्यांदाच PM मोदी आणि CM ठाकरे ‘आमनेसामने’ येणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री पदावरून वाद झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विरोधकांशी हात मिळवणी करत मुख्यमंत्री पदाची शपत घेतली होती. युती तुटल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकमेकांसमोर येणार आहेत. येत्या शनिवारी म्हणजेच 7 डिसेंबरला पुण्यात ही भेट होणार आहे. पुण्यात पोलिस महासंचालक (DGs) आणि महानिरीक्षक (IGs) यांचं वार्षिक संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे हजेरी लावणार आहेत.

मुख्यमंत्री पदावरून वाद झाल्यानंतर भाजप सेनेमध्ये चांगलीच खडाजंगी सुरु झाली होती. मात्र आता पहिल्यांदाच मोदी आणि ठाकरे एका मंचावर दिसणार आहेत. सेना-भाजप युतीमध्ये असताना नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘धाकटा भाऊ’ असा केला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वात जास्त संख्याबळ असलेल्या भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले होते.

मुख्यमंत्री पदावरून वाद झाल्यानंतर शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी आपल्या केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी भाजप आणि शिवसेनेतील युतीला तडा गेल्याचे स्पष्ट झाले होते. एवढेच नाही तर भाजपने शिववसेनेला एनडीएतून बाहेरचा रास्ता दाखवला होता. त्यानंतर संसदेत देखील शिवसेनेच्या खासदारांची जागा बदलण्यात आली होती.

महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे आता आमने सामने आल्यावर दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.