ऐकावं ते नवलच ! लग्नपत्रिकेवर छापला नरेंद्र मोदींचा फोटो आणि दिला हा संदेश…..

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –आजपर्यंत तुम्ही लग्नाच्या अनेक  निमंत्रण पत्रिका पाहिल्या असतील आणि सामान्यपणे या निमंत्रण पत्रिकेवर देवदेवतांची, शुभ चिन्हांची छायाचित्रे असतात. परंतु ज्या निमंत्रण पत्रिकेत तुम्ही पाहिल्या आहेत त्यापेक्षा काही हटके आणि तुम्हाला अचंबित करेल अशा निमंत्रण पत्रिकेबाबत आता आपण वाचणार आहोत. एका तरुणाने लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र असल्याचे समोर आले आहे. सध्या सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र असलेली हीच लग्न पत्रिका बरीच व्हायरल होताना दिसत आहे. इतकंच नाही तर या पत्रिकेवर एक खास संदेशही लिहिला आहे. मोदींचे छायाचित्र असलेल्या या पत्रिकेच्या माध्यमातून एका युवकाने लग्नात अहेर आणला नाही तरी चालेल, पण पुढच्या निवडणुकीत मत मात्र मोदींनाच द्या, असा संदेश दिला आहे.

प्रवीण कुमार असं या लग्न पत्रिकेवर मोदींचा फोटो छापणाऱ्या तरुणाचे नाव असल्याचे समोर आले आहे. सदर तरुण हा पेशाने एसी मेकॅनिक असून, तो कुवेत येथे कामाला आहे. मुख्य म्हणजे तो कर्नाटकमधील मंगळुरूजवळील उल्लाल येथील राहणारा आहे. सदर तरुण  प्रवीण कुमार याने आपल्या विवाहाची पत्रिकाच मोदीमय बनवली असल्याचं दिसत आहे. इतकेच नाही तर महत्त्वाचे म्हणजे या पत्रिकेवर त्याने मोदींच्या छायाचित्राबरोबरच नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने राबवलेल्या विविध योजनांची माहितीही दिली आहे.

प्रवीण कुमार या तरुणाचा विवाह डिसेंबर महिन्यात होणार आहे अशी माहिती समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या तरुणाने विवाहाल उपस्थिती लावणाऱ्या मंडळींना विशेष संदेश दिला आहे. वऱ्हाडी मंडळींनी अहेर आणि भेटवस्तू आणण्याऐवजी पुढच्या निवडणुकीत मोदींना मत देण्याचे आवाहन त्याने या संदेशातून केले आहे. याविषयी माहिती देताना प्रवीण कुमार म्हणाला, ”नरेंद्र मोदींनी देशाला परदेशामध्ये ओळख मिळवून दिली आहे. ते आमच्यासाठी स्वाभिमानाचा विषय आहे. म्हणूनच मी माझ्या विवाह पत्रिकेवर जे काही लिहिले आहे ते मनापासून लिहिले आहे,”असे प्रवीणने सांगितले.