Coronavirus : मुंबईत ‘प्लाझ्मा’ थेरपी यशस्वी ! पुण्यातही प्रयोग करणार, आरोग्य मंत्र्यांची माहिती

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईमधील लिलावती रुग्णालयात कोरोना रुग्णावर पहिली प्लाझ्मा थेरपी करण्यात आली असून त्यात यश मिळालं असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे आता प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग पुण्यासह इतर ठिकाणीही राबविण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. नाशिकमधील जिल्हाधिकारी कार्यालयात करोना उपाययोजना संदर्भात बैठक पार पडली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, कृषीमंत्री दादाजी भुसे, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्यधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे यानी ही माहिती दिली.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्लाझ्मा थेरपीबाबत बोलताना सांगितले की, मुंबईत काल लिलावती रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी करण्यात आली असून ही थेरपी यशस्वी झाली आहे. त्यामुळे प्लाझ्मा थेरपीचा दुसरा प्रयोग मुंबईच्याच नायर रुग्णालयात करण्यात येणार आहे. त्यानंतर पुण्यासह इतर ठिकाणीही केंद्राच्या गाइडलाइननुसारच ही थेरपी केली जाईल, असे टोपे यांनी सांगितले.

मुंबईतील कामाठीपुऱ्यात राहणाऱ्या एका तबलिगी जमातच्या सदस्याने काल लिलावती रुग्णालयात जाऊन त्याचा प्लाझ्मा दिला होता. त्यामुळे एका कोरोनाबाधित रुग्णावर थेरपी करण्यात आली होती. ही थेरपी यशस्वी झाली आहे. दिल्लीच्या मरकजमध्ये गेलेल्या तबलिगीच्या या सदस्याला कोरोना झाला होता. कोरोनावर उपचार घेऊन बरे झालेल्या व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडी तयार होतात. ही अँटीबॉडी बाधित रुग्णाच्या शरीरात गेल्यास तो रुग्ण बरा होतो. एका व्यक्तीच्या प्लाझ्मामुळे तीन व्यक्तींवर उपचार करता येत असल्याचे सुत्रांनी सांगितले.