नाशिकचा पारा घसरला; तापमान 15 अंश सेल्सिअसच्या खाली

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या तीन चार दिवसांपासून हवेत गारवा जाणवू लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा थंडीची चाहूल लागली आहे. गुरुवारी नाशिकचा पारा घसरला असून, किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवले गेले. त्यामुळे नाशिककरांना महाबळेश्‍वरसारखी थंडी अनुभवायला मिळाली.

गुलाबी थंडीने दिवाळीचे आगमन झाले होते. त्यानंतर वातावरणातील बदलामुळे थंडी गायब झाली. त्याच काही ठिकाणी पावसाने तुरळक हजेरी लावली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात थंडी अनुभवायला मिळेल असा अंदाज वर्तवला होता. गेल्या चार दिवसांपासून हवेत गारवा वाढला आहे.

गुरुवारी (ता.३) नाशिकचे किमान तापमान १३ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. महाबळेश्‍वरमध्ये १४.१, सातारा- १४.५, जळगाव- १४.२, औरंगाबाद- १४.२ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात सर्वांत कमी ११.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद गोंदियात झाली.