Coronavirus : 18 ते 23 मार्च दरम्यान परदेशातून भारतात आले 15 लाख प्रवाशी, केंद्रानं राज्य सरकारांना ‘वॉच’ ठेवण्यास सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे. देशामध्ये 18 जानेवारी ते 23 मार्च दरम्यान परदेशातून तब्बल 15 लाख प्रवासी आले आहेत. परदेशातून आलेल्या प्रवाशांवर कडक नजर ठेवण्याचे आवाहन केंद्र सरकारने प्रत्येक राज्यांना केले आहे. देशात आतापर्यंत जेवढे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत त्यांनी कुठे ना कुठे परदेशात प्रवास केलेला आहे.

कॅबिनेट सचिव गौबा यांनी देशातील सर्व राज्य आणि केंद्र शासित राज्यांच्या सचिवांना सांगितले आहे की, कोरोना व्हायरस संदर्भात सध्याची परिस्थिती आणि परदेशातून आलेल्या एकूण प्रवाशांच्या संख्येत खूप मोठी तफावत आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या प्रवाशांनी परदेशात प्रवास केल्याचे समोर आले आहे. या प्रवाशांवर नजर ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.

एका हिंदी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, कोरोनासंदर्भात नागरिकांमध्ये जागृकता वाढत आहे. श्रीनगरमध्ये विदेशातून प्रवास करून आलेल्या प्रवाशांनी आपली माहिती लपवून ठेवल्याच्या 400 तक्रारी नागरिकांनी नियंत्रण कक्षाकडे केल्या आहेत. यामध्ये 200 तक्रारींमध्ये सत्यता आढळून आली असून परदेशातून प्रवास करून आलेल्या 150 जणांना तात्काळ क्वारंट्इन कक्षात दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी कोरोना संसर्ग झालेले रुग्ण हे परदेशातून प्रवास करून आले आहेत किंवा संक्रमीत रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. श्रीनगरमध्ये 90 क्वारंटाइन कक्षामध्ये 1 हजार 750 जणांना ठेवण्यात आले असून या सर्वांनी परदेश दौरा केला आहे.

दरम्यान एका रिपोर्टनुसार, परदेशातून आलेल्या नागरिकांनी संक्रमण झाल्याची माहिती प्रशासनापासून लपवून ठेवण्यासाठी पॅरासिटीमॉल औषध घेत असल्याचे समोर आले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, संक्रमण झाल्याचे लपवून ठेवण्यासाठी अशाप्रकारे औषध घेणे हे धोकादायक आहे. पॅरासिटामॉल औषध घेतल्यानंतर तापावर चार ते सहा तासांचे नियंत्रण ठेवले जाऊ शकते.

इंदौर येथील महात्मा गांधी मेमोरीयल मेडिकल कॉलजचे डॉ. सलिल भर्गव यांनी सांगितले की, अशा प्रकारे औषध घेऊन संक्रमणाची माहिती लपवणे म्हणजे समाजातील इतर नागरिकांनसोबत केलेला विश्वासघात आहे. कोरोना संदर्भात घेण्यात येणाऱ्या खबरदारीवरून हा आजार किती गंभीर आहे हे दिसून येते. त्यातच अशा प्रकारे माहिती लपवून ठेवणे चुकीचे आहे. संसर्ग झालेल्या लोकांनी समजून घेतले पाहिजे की त्यांच्यामुळे स्वत: चे, कुटुंबियांचे आणि आपल्या जवळपास राहणाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.