‘कोरोना’ची लस तयार करण्यासाठी भारत बायोटेक आणि अमेरिकन विद्यापीठ आलं एकत्र, उंदरावरील ‘टेस्ट’ यशस्वी

हैदराबाद : वृत्तसंस्था – कोविड-१९ ची लस तयार करण्यासाठी भारत बायोटेक आणि अमेरिकेच्या फिलाडेल्फिया येथील थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटीमध्ये करार झाला आहे. ही लस जेफरसन कंपनीने विकसित केली आहे. भारत बायोटेकने बुधवारी याची घोषणा केली.

निष्क्रिय झालेल्या रेबीजच्या लसीचा वापर
ही लस निष्क्रिय झालेल्या रेबीज लसीचा वापर करून तयार केली गेली आहे. ही लस कोरोना व्हायरस प्रोटीनचा वाहक म्हणून काम करेल. भारत बायोटेकने एका निवेदनात म्हटले आहे की, या वाहक किंवा लसीमुळे मोठ्या प्रमाणात प्रतिकारशक्ती विकसित होते, जी मुले आणि गर्भवती महिलांसह प्रत्येकासाठी मान्य आहे.

उंदरावरील प्रयोगात मिळाले मोठे यश
संसर्ग रोगतज्ज्ञ प्राध्यापक मॅथियास श्नेल यांच्या प्रयोगशाळेने यावर्षी जानेवारीत ही लस विकसित केली होती आणि नुकतेच प्राण्यांवर त्याच्या परीक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. उंदरांवर या लसीच्या प्रयोगात मोठे यश मिळाले आहे. ही लस दिल्यानंतर उंदराच्या शरीरात मजबूत अँटीबॉडी तयार झाली. शास्त्रज्ञ आता तपासणी करत आहेत की लसीकरण केलेल्या प्राण्यांचे कोरोनाच्या संसर्गापासून संरक्षण होऊ शकते. पुढील महिन्यापर्यंत त्याचे निकाल येण्याची अपेक्षा आहे.

सरकारकडून मंजुरीच्या प्रतीक्षेत
जेफरसन वॅक्सीन इन्स्टिट्यूटचे संचालक आणि जेफरसन विद्यापीठातील मायक्रोबायोलॉजी अँड इम्युनॉलॉजी विभागाचे अध्यक्ष प्रो. श्नेल म्हणाले की, भारत बायोटेकबरोबर भागीदारीमुळे लस तयार करण्याला वेग येईल आणि आम्ही त्याच्या विकासाच्या पुढील टप्प्यात पोहोचू. अद्याप या लसीला सरकारकडून मान्यता मिळालेली नाही. दोन्ही कंपन्या एकत्रितपणे ही लस विकसित करतील आणि जेव्हा सरकारकडून मंजूरी मिळेल तेव्हा त्याचे उत्पादन सर्वसामान्यांसाठी सुरू होईल.