Lockdown : ‘लॉकडाऊन’मुळं दररोज वाढतायेत घरगुती हिंसाचाराच्या घटना, महिला आयोगाकडे येणार्‍या तक्रारींबद्दल घ्या जाणून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाउन भारतात लागू करण्यात आला असून यामुळे घरगुती हिंसाचारात वाढ झाली असल्याचे राष्ट्रीय महिला आयोगाने गुरुवारी सांगितले. एनसीडब्ल्यूच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सांगितले, “घरगुती हिंसाचारासंबंधात अनेकदा तक्रारी आल्या आहेत, ज्यात पती पत्नींना शिवीगाळ करत आहेत आणि त्यांना कोरोना व्हायरस म्हणत आहेत.”

त्यांनी सांगितले की, ‘२४ मार्च ते १ एप्रिल पर्यंत एनसीडब्ल्यूला घरगुती हिंसाचाराच्या ६९ तक्रारी आल्या आहेत आणि त्या दिवसेंदिवस वाढत आहेत. मला दररोज किमान एक किंवा दोन ईमेल येतात, तेही थेट माझ्या वैयक्तिक ईमेल वर. आमच्या अधिकृत ईमेल आयडी आणि फोन नंबर व्यतिरिक्त माझ्या स्टाफ सदस्यांना त्यांच्या वैयक्तिक ईमेल आणि व्हॉट्सऍप क्रमांकावरही घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी येत आहेत.’

लॉकडाऊनमुळे विविध प्रकारच्या तक्रारी पाहिल्या जात असल्याचे एनसीडब्ल्यू प्रमुख म्हणाले. महिला पोलिसांपर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि त्यांना पोलिसांकडे जाण्याची देखील इच्छा नसते कारण जर नवरा पोलिस स्टेशनमधून परत आला तर पुन्हा दोन दिवसांनी तो त्या महिलेवर अत्याचार करेल, ही वेगळी समस्या आहे. पूर्वी महिला घराबाहेर पडून आई-वडिलांकडे पोचत असत पण आता तोही पर्याय नाहीये.

घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होण्याचे एक प्रमुख कारण असे असू शकते की, स्त्रिया पूर्वी त्यांच्या पालकांच्या घरी, कामाच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी मोकळा श्वास घेण्यास सक्षम होत्या. परंतु आता लॉकडाऊन दरम्यान त्यांना गुन्हेगारी मानसिकतेच्या लोकांसह रहावे लागेल.

घरगुती हिंसाचारात बळी पडलेल्या महिलांकडून आलेल्या तक्रारीबद्दल शर्मा म्हणाल्या की, ‘मला आज नैनीताल येथून तक्रार आली आहे जिथे बाई बाहेरगावी जाऊ शकत नाही. तिने सांगितले की तिचा नवरा तिला मारहाण करत आहे आणि तिला शिवीगाळ करत आहे. परंतु ती परत दिल्लीत तिच्या घरी जाऊ शकत नाही. तिला हॉस्टेल किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्याची इच्छा आहे, जिथे ती लॉकडाऊन दरम्यान राहू शकते. तिला पोलिसांकडे जाण्याची देखील इच्छा नाही कारण तिने असे म्हटले आहे की पोलिसांनी तिच्या पतीला अटक केले तर तिच्या सासरचे तिला त्रास देतील.’

शर्मा यांनी आणखी एका तक्रारीचा उल्लेख केला, ज्यात पीडितेच्या नवऱ्याने तिला मारहाण केली आणि तिला कोविड -१९ असे म्हटले. ‘काल मला मोहाली येथून फोन आला की एक महिला आपल्या पतीबरोबर अडकली आहे. तो तिला शिवीगाळ करत आहे आणि म्हणत आहे की ती कोविड -१९ आहे आणि त्यामुळे ती त्रस्त आहे, तिने घर सोडले पाहिजे.’ एनसीडब्ल्यू या तक्रारदारांच्या संपर्कात असल्याचे शर्मा म्हणाल्या. या मुद्द्यावर आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील.

त्या म्हणाल्या की, मी त्यांना वैयक्तिकरित्या कॉल करत आहे. माझी टीम प्रयत्न करत आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी २४x७ उपलब्ध आहोत. जर माध्यमांना असे प्रकरण आढळले तर त्यांनी अशा घटनांची नोंद घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like