Corona Guidelines : हायकोर्टाने म्हटले – राजकीय पक्ष वेगळे नाहीत, कायदा सर्वांसाठी एक सारखा

ग्वाल्हेर : वृत्तसंस्था – कोरोना काळात राजकीय कार्यक्रमांवर प्रतिबंध घालण्याच्या मागणीबाबत दाखल जनहित याचिकेवर शुक्रवारी मध्य प्रदेश हायकोर्टच्या ग्वाल्हेर खंडपीठाने सुनावणी केली. यावेळी कोर्टाने टिपण्णी करताना म्हटले की, राजा असो की रंक कायदा सर्वांसाठी समान आहे. राजकीय पक्षांसाठी वेगळे कायदे नाहीत. कोविड-19 एक भयंकर समस्या आहे. यापासून वाचण्यासाठी करण्यात आलेले नियम सर्वांनाच पाळावे लागतील. राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांसाठी एक अंतरिम आदेश पारित करू. 28 सप्टेंबरला याचिकेवर पुन्हा सुनावणी होईल.

अधिवक्ता आशीष प्रताप सिंह यांनी हायकोर्टात ही जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकार्त्याचे म्हणणे आहे की, कोविड-19मुळे विवाहाचे आयोजन, अन्य सामाजिक कार्यक्रम व अंत्यसंस्कारासाठी जास्त लोक जमवण्यास परवानगी नाही. तरीही शहरात होत असलेल्या राजकीय कार्यक्रमांमध्ये गर्दी उसळ आहे. यामुळे कोरोना संसर्ग वेगाने पसरत आहे. राजकीय पक्षांनी सर्वसामान्य लोकांचे जीवन धोक्यात टाकले आहे. कोविड-19 साठी तयार करण्यात आलेल्या गाईडलाईनचे पालन सुद्धा होत नाही.

शहरात होणार्‍या सर्व सभांवर प्रतिबंध घालण्यात यावेत. ज्यामुळे कोरोना पसरण्यापासून रोखता येईल. याचिकाकर्त्याने नुकत्याच झालेल्या भूमीपूजन कार्यक्रमाचे फोटोसुद्धा सादर केले. कार्यक्रमाला उपस्थित लोकांनी मास्क घातलेले नव्हते, आणि सुरक्षित अंतरदेखील पाळले नव्हते. याचिकाकर्त्याची बाजू ऐकल्यानंतर शासनाकडून सांगण्यात आले की, सरकारने भूमीपूजन कार्यक्रम केले होते, ज्यामध्ये कोविडच्या गाईडलाईनचे पालन करण्यात आले.

शासनाच्या या उत्तरावर याचिकार्त्याने भूमीपूजन व कार्यक्रमाचे फोटो दाखवले. हायकोर्टाने चर्चेनंतर राजकीय कार्यक्रमांसाठी अंतरिम आदेश पारित करणार असल्याचे म्हटले. प्रकरणाची पुढील सुनावणी 28 सप्टेंबरला करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात प्रशासन आणि पोलीसांकडून सुद्धा उत्तर मागितले आहे.