1 जूनपासून धावणार्‍या 200 रेल्वेसाठी आज सकाळी 10 वाजल्यापासून बुकिंग होणार सुरू, इथं पाहा पूर्ण लिस्ट

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – भारतीय रेल्वे 1 जूनपासून देशभरात 100 मार्गांवर ट्रेन सुरू करत आहे. या 100 मार्गांवर दोन्हीकडून 200 ट्रेन सुरू होणार आहेत. या ट्रेनमध्ये एसी आणि नॉन एसी असे दोन्ही प्रकारचे कोच असतील, जे पूर्णपणे सुरक्षित असतील. या ट्रेनमध्ये 73 एक्सप्रेस ट्रेन, 5 दुरान्तो आणि अन्य जन शताब्दी ट्रेन असतील. या गाड्यांसाठी आरक्षण 21 मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होईल. रेल्वेने म्हटले की, या ट्रेनसाठी तिकिट आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर किंवा मोबाईल अ‍ॅपवर जारी करण्यात येतील. यासाठी आरक्षण केंद्र किंवा रेल्वे स्थानकांमध्ये कोणतेही तिकिट जारी केले जाणार नाही.

रेल्वेने म्हटले आहे की, सामान्य श्रेणीतील कोचसुद्धा बसण्यासाठी आरक्षित असतील. या ट्रेनमध्ये कोणताही कोच अनारक्षित असणार नाही. तसेच भाडे सामान्य असेल. आरक्षित सामान्य कोचसाठी दुसर्‍या श्रेणीतील सीटचे भाडे घेतले जाईल. या ट्रेनमध्ये सर्व प्रवाशांना सीट उपलब्ध करून दिली जाईल, तसेच या ट्रेन 1 जूनपासून धावतील.

रेल्वेने म्हटले की, अगाऊ आरक्षणाचा कालावधी कमाल 30 दिवसांचा राहील. सध्याच्या नियमांप्रमाणे आरएसी आणि प्रतिक्षा यादी तयार होईल. मात्र, प्रतिक्षा यादीतील प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी मिळणार नाही. या ट्रेनसाठी कोणतेही अनारक्षित तिकिट जारी करण्यात येणार नाही आणि तसेच ट्रेनमध्ये बसल्यावर कोणतेही तिकिट देण्यात येणार नाही.

केवळ कन्फर्म तिकिट असणार्‍यांनाच रेल्वे स्थानकाच्या परिसरात प्रवेश दिला जाईल. आरएसी आणि वेटींग तिकिटेसुद्धा दिली जातील. परंतु, वेटींग तिकिट असणार्‍यांना ट्रेनमध्ये चढता येणार नाही. या ट्रेनचे वेळापत्रक नियमित ट्रेनप्रमाणेच असेल. या गाड्यांचे थांबे आणि फ्रिक्वेन्सीसुद्धा नेहमीच्या गाड्यांप्रमाणेच असणार आहे.