सत्यपाल मलिक मेघालयाचे नवे राज्यपाल तर महाराष्ट्रासह गोव्याचा अतिरिक्त कार्यभार संभाळणार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  एएनआइ च्या बातमीनुसार गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची मेघालयाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना गोव्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. या दोन ही राज्यपालांची तेव्हाच नेमणूक अंमलात येईल जेव्हा ते पदभार स्वीकारतील.

कोण आहेत हे सत्यपाल मलिक

सत्यपाल मलिक हे ऑगस्ट 2018 ते ऑक्टोबर 2019 पर्यंत जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. त्यानंतर राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी 25 ऑक्टोबरलाच जम्मू-काश्मीरमधून त्यांची बदली करून गोव्याचे राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक केली होती आणि त्यांच्या जागी गिरीशचंद्र मुर्मू यांची जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल म्हणून नियुक्ती केली गेली. जम्मू-काश्मीरमधील त्यांच्या कार्यकालदरम्यान कलम 370 काढून टाकण्यात आले आणि या मध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

सत्यपाल मलिक 21 एप्रिल 1990 ते 10 नोव्हेंबर 1990 पर्यंत केंद्रीय राज्यमंत्री (संसदीय आणि पर्यटन) होते. ते 1980-84 आणि 1986 ते 1989 पर्यंत राज्यसभेचे खासदार आणि 1989 ते 1990 पर्यंत लोकसभेचे खासदार राहिले आहेत. मलिक हे 1974 ते 1977 या काळात यूपी विधानसभेचे सदस्य होते. सत्यपाल मलिक यांनी मेरठ विद्यापीठातून बीएससी आणि एलएलबीचे शिक्षण घेतले.