… म्हणून ज्योतिरादित्य शिंदेंनी सोडला काँग्रेसचा ‘हात’, जाणून घ्या कारणं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशचे प्रमुख नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. ज्योतिरादित्य यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. यात, प्रश्न पडतो की ज्योतिरादित्य शिंदेंनी काॅंग्रेसशी असलेले 18 वर्ष जुने नाते का तोडले ? दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे अनेक दिवसांपासून काॅंग्रेस सरकार व संघटनेवर नाराज होते. त्यांचे मंत्र्यांशी बोलणे नव्हते. त्यांनी पूर्ण वर्षभर वाट पाहिली. अखेर त्यांचा संयम तुटल्याचे म्हटले जात आहे. मात्र, स्वतः शिंदे यांनी याबाबत खुलासा केला आहे. ज्योतिरादित्य म्हणाले की, काॅंग्रेस आता पूर्वी सारखा पक्ष राहिला नाही, काॅंग्रेसमध्ये राहून लोकसेवा होऊ शकत नाही.

कमलनाथ यांच्यावर साधला निशाणा :
जेपी नड्डा यांच्यासमवेत पत्रकार परिषदेत ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, आज काॅंग्रेसमध्ये जी परिस्थिती उद्भवली आहे, त्यात लोकसेवेचे उद्दीष्ट पूर्ण होत नाही. याखेरीज काॅंग्रेस पक्ष पूर्वीचा पक्ष राहिलेला नाही. ते पुढे म्हणाले की, काॅंग्रेस पक्ष वास्तव, नवीन नेतृत्व – नवीन कल्पना नाकारत आहे. या वातावरणात राष्ट्रीय पातळीवर जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती मध्य प्रदेशातही आहे, राज्य सरकार आपली स्वप्ने पूर्ण करू शकले नाही.

मध्य प्रदेशच्या कमलनाथ सरकारवर निशाणा साधताना ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की 2018 मध्ये आम्ही एक स्वप्न घेऊन आलो होतो, पण ती स्वप्ने पूर्ण झाली नाहीत. मध्य प्रदेशातील काॅंग्रेस सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. काॅंग्रेसमध्ये राहून लोकसेवा करता येणार नाही. तसेच आज मध्य प्रदेशात ट्रान्सफर माफिया उद्योग सुरू आहे. राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी मला एक नवीन व्यासपीठ देण्याची संधी दिली असल्याचेही शिंदे यावेळी म्हणाले.

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रवेशाबद्दल शिवराजसिंह चौहान म्हणाले की, कमलनाथ सरकारने राज्यात काहीही केले नाही आणि भ्रष्टाचाराला चालना दिली. शिवराज म्हणाले की, भारतीय जनता पक्षात महाराज आणि शिवराज एक आहेत.