बाप बदलणाऱ्यांमध्ये पवारांची गणना करणार का ?,गणेश नाईकांचा जितेंद्र आव्हाडांवर पलटवार

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच रणधुमाळी सुरु झाली असून भाजपचे नेते गणेश नाईक आणि राष्ट्रवादीचे नेते व मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये कलगीतुरा रंगताना दिसून येत आहे. या दोन नेत्यांनी निवडणुकीच्या भषणामधून एकमेकांचे बाप काढले आहेत. बाप बदलणारी औलाद नाही, असे आव्हाड म्हणाले होते. आव्हाडांवर पलटवार करत पक्षांतर करणाऱ्या शरद पवारांची गणनाही बाप बदलणाऱ्या औलादींमध्ये करणार का ? असा सवाल उपस्थित केला आहे. निवडणुकीच्या निमित्ताने या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवली आहे.

बाप बदलणारी औलाद नाही अशी खोचक टीका आव्हाड यांनी नाईक यांच्यावर केली होती. त्याला नाईक यांनी प्रत्युत्तर देत म्हटले की, पवारांनी तीनवेळा पक्ष बदलला आहे. मग त्यांचीही गणना बाप बदलणाऱ्या औलादीमध्ये करणार का ? असा सवाल नाईक यांनी केला आहे. पवारांनी समाजकारण आणि राजकारण गतीमान व्हावं यासाठी एस काँग्रेसची स्थापना केली होती. पुलोद सरकारचं नेतृत्व केलं होतं. नंतर पुन्हा तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 1999 मध्ये पुन्हा काँग्रेस सोडून राष्ट्रवादीची स्थापना केली. मग याला काय म्हणाल ? असा प्रश्न गणेश नाईक यांनी केला आहे.

गणेश नाईक पुढे म्हणाले, बाप बदलणारी औलाद मी नाही, असे वक्तव्य आव्हाडांनी केले. पण कोणीही एकाएकी पक्ष बदलत नाही. समाजकारण आणि राजकारणाला गती देण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. स्वाभिमान जतन करण्यासाठीही पक्षांतरासारखा निर्णय घ्यावा लागतो हे आव्हाडांना कसं कळणार ? असा टोला नाईक यांनी लगावला आहे. आता याला जितेंद्र आव्हाड कसे उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

काय म्हणाले होते आव्हाड ?
गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधताना जितेंद्र आव्हाड म्हणाले होते, जितेंद्र आव्हाड स्वत:चे डायलॉग स्वत: मारतो, कोणाचे चोरलेले डायलॉग मारत नाही. मी स्वत: स्क्रिप्ट लिहतो, स्वत: डायलॉग मारतो आणि स्वत:च्या आवाजात मारतो. मी एकदाच नवी मुंबईत गेलो तर गणेश नाईकांनी कथकली सुरु केली. अजून तर मी शंभरवेळा जाणार आहे. त्यानंतर माझा बाप देखील येईल. मला दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही, अशी घणाघातील टीका त्यांनी नाईक यांच्यावर केली होती.