जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल, म्हणाले – ‘गणेश नाईकांचा छा…दैया बघायला तयार रहा’

ठाणे : पोलिसनामा ऑनलाईन – नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि भाजप नेते गणेश नाईक यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगला आहे. गणेश नाईक यांनी बापाचा उल्लेख करत केलेल्या टीकेला आव्हाड यांनी त्याच शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ‘माझा बापही नवी मुंबईत येणार आहे,’ असा इशारा भाजप नेते गणेश नाईक यांना दिला आहे. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक पुढील महिन्यात आहे.

निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये गेलेल्या गणेश नाईक यांच्याकडून नवी मुंबईचा बालेकिल्ला खेचून घेण्याची तयारी महाविकास आघाडीनं केली आहे. भाजप नेते गणेश नाईक यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे अत्यंत आक्रमकपणे प्रचार करत आहेत. आव्हाड यांच्याकडून नाईक कुटुंबावर थेट हल्ले चढवले आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडून ही त्यांना प्रत्युत्तर दिलं जात आहे. गणेश नाईक यांना शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी नव्वदच्या दशकात समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली. पण १९९९मध्ये त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली.

त्यानंतर गणेश नाईक यांना २०१४ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सांभाळलं. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीलाही दगा दिला. गद्दारी नाईकांच्या रक्तातच आहे,’ असा हल्ला आव्हाड यांनी चढवला होता. त्यानंतर त्यास उत्तर देत नाईक यांनी बापाचा उल्लेख केला होता. ‘ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक, असा फिल्मी स्टाइल डायलॉग म्हणत जिंतेन्द्र आव्हाडांना आव्हान दिलं होतं. ‘मी एकदा नवी मुंबईत जाऊन भाषण काय केलं, गणेश नाईकांनी कथकली सुरू केली. आणखी शंभरवेळा मी तिथं जाणार आहे आणि नंतर माझा बापही येणार आहे. त्यामुळं नवी मुंबईकरांनो गणेश नाईकांचा छा… छैया बघायला तयार रहा,’ असं नाईकांच्या या टीकेला आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.