… म्हणून बास्केटबॉलपटू आणि NBA स्टार ‘कोबे ब्रायंट’ होता ‘महान’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जागतिक क्रिडा क्षेत्रासाठी सोमवारची सकाळ दु:खद ठरली. सुप्रसिद्ध माजी बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंटचा अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. या अपघातात त्याची 13 वर्षीत मुलगी गियेना जी बास्केटबॉलपटू होती तिचाही मृत्यू झाला.

बास्केटबॉलपटू म्हणून कोबी ब्रायंटचं नाव आघाडीवर घेतलं जातं. कोबीच्या निधनाचे वृत्त येताच सोशल मिडियावर पहिल्या 10 पैकी सर्व ट्रेंड कोबी ब्रायंट संदर्भात होते. यावर कोबीच्या लोकप्रियतेचा अंदाज येईल. फक्त अमेरिका किंवा बास्केटबॉल लोकप्रिय असलेल्या देशातील लोकांनीच नाही तर भारतातील अनेक क्रिडा आणि सिनेक्षेत्रातील व्यक्तींनी श्रद्धांजली वाहिली. ज्यात करण जोहर, प्रिती झिंटा, माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग इत्यादींचा समावेश आहे. बीसीसीआयने देखील कोबी ब्रायंटला ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली.

कोबी बास्केटबॉल कोर्टमधील महान व्यक्ती होता. आयुष्यातील दुसऱ्या टप्प्याला ते सुरुवात करणार होते. गियेनाच्या निधनाने एक वडील म्हणून दु:ख वाटते. मी आणि मिशेल ब्रायंट कुटूंबासोबत आहोत असे अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा म्हणाले.

पाच वेळा बास्केटबॉल असोसिएशन अर्थात एनबीएचा कोबी ब्रायंट चॅम्पियन ठरला होता. बास्केटबॉलच्या इतिहासात सर्वात महान खेळाडू अशी त्याची ओळख होती. एनबीएने कोबीच्या मृत्यूनंतर शोक संदेशात म्हटले, कोबी आणि त्याच्या 13 वर्षीय मुलीच्या निधनामुळे आम्हाला धक्का बसला. 20 वर्ष कोबीने सर्वोत्तम खेळ केल्यास अशक्य गोष्ट देखील शक्य होऊ शकते हे दाखवून दिले.

कोबी आपल्या 20 वर्षांच्या करिअरमध्ये एजल्सकडून खेळला. कोबीने 2008 मध्ये एनबीएचा सर्वात महान खेळाडूचा किताब मिळवला होता. तो 2016 साली निवृत्त झाला होता. एनबीए फायनल्समध्ये एमव्हीपी किताब त्याला दोनवेळा मिळाला होता. कोबीने दोन वेळा ऑलिम्पिक पदक देखील जिंकले आहे. 2006 मध्ये टोरांटो रॅपटर्सविरुद्धच्या सामन्यात कोबीने एका सामन्यात 81 गुण मिळवले होते, त्याच्या करिअरमधील ही सर्वोत्तम खेळी होती.

ऑस्कर विजेता कोबी –
बास्केटबॉलमधील अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळवणाऱ्या कोबीने ऑस्कर पुरस्कार देखील पटकवला होता, कोबीने 2015 साली बास्केटबॉलला एक प्रेम पत्र लिहिले होते. या प्रेम पत्रावरुन एक शॉर्ट अॅनिमेटेड चित्रपट तयार करण्यात आला होता. या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटाला डिअर बॉस्केट बॉल असे नाव देण्यात आले होते.