राष्ट्रवादीतून भाजपमध्ये ‘एन्ट्री’ केलेल्या नेत्याला लागली लॉटरी, पक्षानं सोपवली ही मोठी जबाबदारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झालेले जालिंदर कामठे यांच्या घरवापसीची चर्चा सुरू होती. मात्र असे असतानाच भाजपने त्यांची पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कामठे यांना शुक्रवारी (दि. 22) नियुक्तीचे पत्र दिले आहे. त्यामुळे कामठे यांच्या घरवापसीच्या चर्चेला आता पुर्णविराम मिळाला आहे.

पुणे येथे नियुक्तीपत्र देतेवेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, अतुल देशमुख, प्रवीण काळभोर आदी उपस्थित होते. जालिंदर कामठे हे काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचे व पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. कामठे यांच्या बंगल्यावरच सन 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली. राष्ट्रवादीकडून तेच जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष बनले.

त्यानंतर 2014 ते 2018 या कालावधीत पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते. तर सन 2018 पासून राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस झाले. मात्र, पुरंदर विधानसभा मतदारसंघ जागावाटपात राष्ट्रवादीकडून काँग्रेसकडे गेला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, ते पक्षात फारसे सक्रीय नव्हते. भाजपच्या जिल्ह्यातील कोअर कमिटीत मात्र होते. दरम्यान, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पुरंदरमध्ये राष्ट्रवादीला अनेक ठिकाणी फटका बसला. त्यामुळे नव्या सत्तासमीकरणांमध्ये कामठे यांच्यासारखा नेता राष्ट्रवादीत हवा, अशी चर्चा सुरु झाली आहे.