महाराष्ट्राचं ‘महाभारत’ ! भाजप, शिवसेनेला ‘जे’ जमलं नाही ‘ते’ राष्ट्रवादी करून दाखवणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप शिवसेनेकडे पुरेस संख्याबळ असूनही केवळ मुख्यमंत्री कोणाचा होणार या वादावरून दोनीही पक्षांनी एकत्रितपणे सत्ता स्थापन करण्यास नकार दिला. त्यानंतर भाजपने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय दर्शवला. राज्यपालांनी त्यानंतर शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी बोलावले मात्र सेनेने कालावधी वाढवून मागितला होता. राज्यपालांनी मात्र वेळ वाढून मिळणार नसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केले. आता राष्ट्रवादी कोणत्या प्रकारे सत्ता स्थापन करणार याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

राष्ट्रवादीला सुद्धा वेळेची मर्यादा देण्यात आलेली आहे अशात राष्ट्रवादीला काँग्रेस जरी सोबत असली तरी शिवसेनेचा पाठींबा निश्चित लागणार आहे. त्यामुळे शरद पवार यावेळी नेमकी काय खेळी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कारण शिवसेनेशिवाय सरकार स्थापन करणे सध्या तरी राष्ट्रवादीसाठी शक्य नाही.

काँग्रेसला शिवसेनेला पाठींबा देण्यापेक्षा राष्ट्रवादीला पाठींबा देणे अधिक सोयीचे वाटते त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिब्याबाबत लगेच तयारी दर्शवू शकते. काँग्रेसने पाठिंब्याचे पत्र न दिल्याने शिवसेना सत्ता स्थापनेपासून दूर राहिली आहे. आम्हाला वेळ वाढवून हवा होता मात्र राज्यपालांनी तो दिला नसल्याचे काल आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्ट केले होते.

भाजप सत्तेपासून दूर जातंय हे स्पष्ट झाले होते त्यानंतर शिवसेनेकडून जोरदार हालचाली झाल्या आणि आता शिवसेना सत्ता स्थापन करणार असे सर्वांनाच वाटू लागले मात्र ऐन वेळी वेळ संपली आणि सत्ता स्थापनेचा सस्पेन्स पुन्हा वाढला. शिवसेनेसोबत जाण्याबाबत काँग्रेसमध्ये एकमत होऊ न शकल्याने शिवसेनेला पाठिंब्याचे पत्र मिळाले नाही अशी माहिती सूत्राकडून मिळाली आहे.

राज्यात कोणत्याच पक्षाकडे बहुमत नसल्याने एकत्रित येऊनच सत्ता स्थापन करावी लागणार आहे. त्यामुळे आता नेमकं कोण सत्ता स्थापन करणार की राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून आहे.

Visit : Policenama.com