राष्ट्रवादीच्या ‘त्या’ नगरसेवकांची होणार हकालपट्टी ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकसभेसाठी जागा वाटप जवळपास पूर्ण होत असताना व पक्षाचे अध्यक्ष भाजपविरोधात सर्व विरोधकांची एकजुट गरजेची असल्याचे सांगत असताना भाजपला  बिनशर्त  पाठिंबा दिल्याने पक्षाची प्रतिमा धुळीला मिळाल्याने आता त्या १८ नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे याची घोषणा आज करण्याची शक्यता आहे.

अहमदनगरमध्ये शिवसेनेला बाजूला ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा देऊन त्यांचा महापौर आणि उपमहापौर निवडून आणला. सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरु झाली असताना थेट भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला गेल्याने राज्याच्या राजकारणात एक खळबळ निर्माण झाली. त्याची झळ थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांना बसू लागली. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने पाठिंबा न मागताच व सर्व निकाल जाहीर होण्यापूर्वीच शरद पवार यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा देऊ केला होता, याची लोकांना आठवण झाली.
गेल्या चार वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह अनेकांनी बारामतीला भेटी दिल्या. मोदी यांनी तर शरद पवार यांचा सल्ला घेत असल्याचे म्हटल्याने राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची भूमिका नेहमीच संशयास्पद राहिली आहे. आता लोकसभा निवडणुकाचे वारे वाहू लागल्यानंतर पवार यांनी मोदी विरोधात जोरदार भाषणे सुरु केली आहेत. अशात अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिल्याने पक्षाच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त होऊ लागला. त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिमेवरही परिणाम झाल्याचे लक्षात आल्यावर आता पक्षाचे वरिष्ठ नेत्यांची चलबिचल सुरु झाली. त्यातूनच डॅमेज कंट्रोल करण्यासाठी या १८ नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची घोषणा स्वत: शरद पवार करणार आहेत.