गडकरी म्हणतात… २ कोटी रोजगार एकट्या माझ्या खात्यानेच दिले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी दावा केला आहे. देशात २ कोटी रोजगार आपल्या एकट्याच्या मंत्रालयाने दिल्याचा त्यांनी दावा केला आहे. गडकरींच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून गडकरींच्या या अजब कारभाराला म्हणावे तरी काय, असा सवाल उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, देशातील बेरोजगारीचा दर गेल्या ४५ वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक असल्याची माहिती राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या अहवालातून समोर आल आहे. असे असताना नितीन गडकरी कशाच्या आधारे रोजगार दिल्याचे सांगत आहेत ? असा सवाल उपस्थित केला आहे. तर गडकरी त्याच्या या अजब कारभाराला म्हणावे तरी काय असा प्रश्न जनतेला पडला असल्याचे म्हटले आहे.

नोटबंदी आणि बेरोजगारीवरून विरोधकांनी भाजपा सरकारला धारेवर धरले आहे. भाजपा सरकारने सत्तेत येण्यापूर्वी दोन कोटी रोजगार उपलब्ध करू असे आश्वासन जनतेला दिले होते. मात्र मागील पाच वर्षात नोटबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेले असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. यातच गडकरी यांनी आपल्या मंत्रालयाने दोन कोटी रोजगार निर्माण केल्याचे म्हटले आहे. यावर राष्ट्रवादीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर गडकरी यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीने केलेल्या ट्विटर अकाऊंटवर म्हटले आहे, ‘केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नोकऱ्या आहेतच कुठे? असे वक्तव्य केले होते. पण आपल्या वक्तव्यावरून सरळ घुमजाव करत आता गडकरी यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत २ कोटी रोजगार माझ्याच खात्याने दिले असल्याचे तर्कशून्य वक्तव्य करत आहेत’.

यावरुन विरोधक आता गडकरींवर निशाणा साधत आहेत. गडकरींच्या कामाबाबत विरोधकांनी याआधी कधीही प्रश्न उपस्थित केला नव्हता. मात्र त्यांच्या या विधानामुळे विरोधकांना त्यांनी टीका करण्याची आयती संधीच दिली आहे.