कोणता नेता कशामुळे भाजपमध्ये गेला कागदपत्रांसह सांगतो : अजित पवार

मुंबई : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षातील अनेक नेते पक्ष सोडून भाजपमध्ये गेले. याविषयी बोलताना अजित पवार म्हणाले, लोकसभा निवडणूक होऊ द्या, कोणता नेता कशामुळे पक्ष सोडून भाजपमध्ये गेला ते कागदपत्रांसह सांगतो, असा खळबळजनक दावा अजित पवार यांनी केला. एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार बोलत होते.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव भाजपमध्ये गेले. तसेच काँग्रेसचे नेते आणि विरोधीपक्षनेते राधाकृष्ण पाटील यांचे चिरंजीव देखील भाजपमध्ये गेले. त्यांच्यासह राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावर बोलताना, एकदा निवडणूक होऊ द्या.

यापैकी प्रत्येक जण पक्ष सोडून का गेला, त्यामागे काय कारण आहे, कोणाच्या पाठीमागे कोणता ससेमिरा लावण्यात आला होता याची कागदपत्रांसह माहिती निवडणुकीनंतर देतो. भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांबद्दल बोलताना पवार म्हणाले, “या नेत्यांपैकी कुणाला आपला कारखाना वाचवायला पैशाची मदत हवी होती म्हणून ते गेले. तर काहींच्या पतसंस्था, कारखाने अडचणीत आलेले होते. डोक्यावर कर्ज होतं म्हणून त्यांनी सत्ताधारी पक्षाचा आश्रय घेतला”.

डॉ. सुजय विखे यांच्या उमेदवारीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “सुजय विखे यांना देखील राष्ट्रवादीकडून तिकीट देण्यास आम्ही तयार होतो. त्याबाबत त्यांच्या पक्षातील वरिष्ठांशी त्यांची चर्चा देखील झाली होती. मात्र तरी देखील सुजय विखेंनी भाजपमध्ये प्रवेश केला”.