सत्तानाट्यात अजूनही ‘गुफ्तगू’ सुरू ? अजित पवारांनी दिलं त्यांच्याच ‘स्टाईल’ मध्ये उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बहुमत चाचणीवेळी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी उडाली. भाजपने सभात्याग केल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारला बहुमत सिद्ध करणं सोप झालं. मात्र सकाळी भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली. याबाबत अजित पवारांनी आपल्या शैलीत उत्तर दिले.

महाआघाडीच्या सरकारने बहुमत सिद्ध केलं असलं तरीही विविध नेत्यांमध्ये गुप्तगू सुरु आहे का, असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, असं काहीही नाही. तुम्ही उगाच अशा बातम्या चालवत जाऊ नका. असं काही वाटलं तर आधी मला फोन करत जा. मग मी सांगेन की असं झाले आहे की नाही. माझा फोन मी स्वत: उचलतो. असं म्हणत अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली.

उपमुख्यमंत्रिपदावरून अजूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादीत वाद आहे का असे विचारले असता अजित पवार म्हणाले असा कोणताही वाद नाही. मला पक्ष जी जबाबदारी सोपवेल ती मी पार पाडेन. त्यामुळे त्यांची राजकीय महत्वकांक्षा लपून राहिलेली नाही. त्यामुळे ते अजूनही उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीतून उपमुख्यमंत्रिपदासाठी अनेक नेते इच्छुक आहे. यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, जयंत पाटील आणि अजित पवार हे तीन नेते आघाडीवर आहेत. मात्र उपमुख्यमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे जाणार असल्याची माहिती आहे. कारण राष्ट्रवादीत अजित पवार यांचा समर्थक मोठा गट आहे. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद मिळावं, यासाठी त्यांच्या समर्थकांचा पक्षावर दबाव आहे.

Visit : Policenama.com