‘ते जित्राब लय वाईट’ ! अजित पवार यांची पडळकरांवर सडकून टीका

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – काहीजण बिब्बा कालवायचं काम करतात. ते जित्राब लय वाईट, त्यांचा अजिबात विचार करु नका, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर सडकून टीका केली.

बारामतीमध्ये आज अजित पवार यांच्या हस्ते पोलिओ लसीकरणाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर गदिमा सभागृहात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात बोलताना त्यांनी पडळकरांचे नाव न घेता टीका केली.
यावेळी शिरुरचे आमदार अशोक पवार, जुन्नरचे आमदार अतुल बेनके उपस्थित होते.

नाहीतर रात्रीची पण कामं केली असती

बारामतीकर पवार साहेबांना तसचं सुप्रिया सुळे आणि मलाही पाठिंबा देतात म्हणून आम्हाला असं वाटतं जेवढ्या लवकर होईल तेवढे काम करावं. सकाळी दिवस उजाडल्यानंतर आम्ही काम सुरु करतो. सूर्य उगवून दिसायला लागलं की, आम्ही कामाला सुरुवात करतो नाहीतर रात्रीची पण काम केली असती, असे अजित पवार यांनी आपली भावना व्यक्त केली.

ते जित्राब लय वाईट

जर काही चांगलं चाललं असताना आपल्याकडे म्हणतात काही जण बिब्बा कालवायचं काम करतात. ते जित्राब लय वाईट, त्यांचा अजिबात विचार करु नका, तसं ही बारामतीकर विचार करत नाही. जर बाहेरचं कुणी पार्सल आलं तर त्याच डिपॉझिट जप्त करुन परत पाठवतात, असे म्हणत अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता टोला लगावला. पडळकर यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.

अन् सभागृहात एकच हशा पिकला

अजित पवार म्हणाले, पवार साहेबांचे वय 80 झाले. मी 60 ला आहो आहे, सुप्रिया देखील पन्नांशीला आली आहे, जसंजसं आमचं वय वाढेल तसंतसं आमचा उत्साह वाढतच चालला आहे, असे म्हणत ते पुढे मिश्किलपणे म्हणाले कामाचा बरं का, असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.