यंदा माझा वाढदिवस साजरा करु नये : उपमुख्यमंत्री अजित पवार

पोलीसनामा ऑनलाईन टीम – राज्यावरील कोरोनाचे संकटामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदा त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. कुणीही माझा वाढदिवस साजरा करु नये, कोणतेही जाहीर कार्यक्रम आयोजित करु नयेत, कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करावे, राज्याला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन पवार यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. कोरोना संकटामुळे हा वाढदिवस कोणत्याही स्वरुपात साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक बांधवांनीही वाढदिवसानिमित्त कुठलाही कार्यक्रम आयोजित करु नये. भेटीगाठी टाळाव्यात. त्याऐवजी कोरोनामुळे अडचणीत आलेल्या नागरिकांना मदत करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे . माझ्यावर, राष्ट्रवादी काँग्रेसवर, पवार कुटुंबावर प्रेम करणार्‍या असंख्य कार्यकर्त्यांच्या, सहकार्‍यांच्या, पाठिराख्यांच्या, हितचिंतकांच्या, राज्यातील तमाम जनतेच्या शुभेच्छा माझ्यासाठी निश्चितंच खूप मोलाच्या आहेत. या शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. कृपया त्या शुभेच्छा ई-मेल, फेसबुक, व्हॉट्स्प, ट्विटर आदी डिजिटल माध्यमांद्वारे अवश्य पाठवाव्यात. असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.