भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या रथाच्या सारथीच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेस धावली

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन –  भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवणी यांनी काढलेल्या रथ यात्रेतील त्यांच्या रथाचे सारथी सलीम मखानी यांच्या मदतीला राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे नेते आणि गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड धावून आले आहेत. सलीम मखाली यांची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांच्या फुफ्फुसांना इन्फेक्शन झालं आहे.

सलीम मखानी यांना शुक्रवारी (दि.4) रोजी डोंबिवली शास्त्री नगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्यानं त्यांना काही काळ खोळंबून रहावं लागलं. अनेक प्रयत्न करूनही त्यांना बेड मिळाला नाही. धक्कादायक म्हणजे सलीम यांना शास्त्री नगर रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडर हातात धरून खुर्चीवर बसून रहावं लागलं.

मंत्री जितेंद्र आव्हाड यांना याबाबत रात्री माहिती मिळाली. वेळेचं गांभीर्य ओळखून घेऊन त्यांनी तातडीने बेड मिळवून दिला. एवढंच नाही तर शिवाय दोन महागडी इजेक्शन पाठवून दिली. एक 40 हजार किंमतीचे आहे. अशी दोन इंजेक्शन्स जितेंद्र आव्हाड यांनी रात्री अडीच वाजता सलीम मखानी यांच्यासाठी मोफत पाठवली. तसेच आणखी लागली तर सांगा असेही त्यांनी सांगितले.

सलीम मखानी यांच्यावर सध्या भायखळा येथील मदिना रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, सलीम मखानी हे लालकृष्ण अडवाणी यांच्या रथ यात्रेत त्यांच्या रथाचे सारथी होते. सलीम यांचे सर्व राजकीय मंडळींशी जवळचे संबंध आहेत. मात्र, तरी देखील सलीम यांची ही अवस्था असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न डोंबिवलीच्या नागरिकांना पडला आहे.