‘मातीसाठी खेळू रक्ताची होळी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशभरात होणारी आंदोलनं सध्या देशभर चर्चेचा विषय आहे. या आंदोलनांमुळे देशात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. देशातील विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष या कायद्याला जोरदार विरोध करत आहेत. महाराष्ट्रात देखील या कायद्याविरोधात आंदोलने होत असून भाजप वगळता इतर पक्षांनी या कायद्याला विरोध दर्शविला आहे. राज्यातील प्रमुख पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनंही या कायद्याला विरोध केला आहे. या संदर्भात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक कविता शेअर करत याबाबत अप्रत्यक्ष भाष्य केले.

‘ह्या मातीत आहे राख आमच्या बा च्या बा ची, कुठून आणू कागद दाखवायला माझ्या ओळखीची, तेव्हा बी गोळ्या झेलल्या आज बी झेलू, ह्या मातीसाठी रक्ताची होळी कधी बी खेळू,’ अशी कविता शेअर करत जितेंद्र आव्हाड यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याला आपला विरोध दाखवला आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे समाजात फूट पडून लोकांच्या मुलभूत हक्कांवर गदा आणण्याचं काम होतेय असा आरोप या कायद्याविरोधात होत असून, ठिकठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून मोदी सरकारच्या निर्णयाचा निषेध केला जात आहे. या कायद्याविरोधात आता मोठ्या प्रमाणात कॉलेज मधील युवक वर्ग रस्त्यावर उतरला असून ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत. त्यामुळे सरकारने देखील काही प्रमाणात का होईना नमतेपणाची भूमिका घेतली असल्याचे दिसत आहे. या आंदोलनात भाजप वगळता इतर अनेक राजकीय पक्षांनी सहभाग घेतला असून राज्यभरात या कायद्याचा विरोध होताना दिसतोय.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/