9 वर्षांपुर्वीच्या ‘त्या’ ट्विटवरून जितेंद्र आव्हाडांचा अभिनेत्याला टोला, म्हणाले – ‘अक्षय, तू आता कार वापरत नाहीस का ?’

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती करण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला होता. मागणी नसल्याने मे अखेरीस शहरांमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर सुमारे ७६ रुपये, तर डिझेलचा प्रतिलिटर दर ६५ रुपयांच्या जवळपास होता. पण गेल्या १९ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आज देखील देशात पेट्रोलच्या दरात १६ पैशांची तर डिझेलच्या दारात १४ पैशांची वाढ करण्यात आली. यावरुन राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेता अक्षय कुमार याला काही प्रश्न विचारत टोला लगावला आहे.

अक्षय कुमारने काँग्रेस सरकारच्या काळात इंधन दरवाढीवरून एक ट्विट केलं केलं होत. ‘मुंबईकरांनी पेट्रोल पुन्हा महागण्याआधी पेट्रोल पंपावर लांबलचक रांगा लावल्या आहेत. त्यात अडकल्याने मला रात्री घरीही जाता आलं नाही,’ असं अक्षयनं त्या ट्विटमध्ये म्हटलं होत. यावरुन आव्हाड यांनी त्याच्यावर निशाणा साधत प्रश्न विचारले आहेत.

‘अक्षय, तू ट्विटरवर सक्रिय नाहीस का ? तू कार वापरणं बंद केलं आहेस का ? तू वर्तमानपत्र वाचत नाहीस का? देशात पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे, हे मी तुला तुझ्या माहितीसाठी सांगतो आहे,’ असं आव्हाडांनी ट्विट करत म्हटलं आहे. नऊ वर्षांपूर्वी इंधन दरवाढीवरुन बोलणाऱ्या अक्षयनं आता व्यक्त व्हावं, अशी अपेक्षा आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली. तसेच या ट्विटला त्यांनी अक्षय कुमारलाही टॅग केलं आहे. देशात सलग एकोणिसाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत घट होऊन ४० डॉलर्स प्रति बॅरलच्या जवळपास आल्या आहेत. तरीही पेट्रोलच्या दारात ८.६६ रुपयांची, तर डिझेलच्या दारात १०.६२ रुपयांची वाढ करण्यात आली. देशात पहिल्यांदाच डिझेलचा दर पेट्रोलपेक्षा जास्त झाला आहे.