बिहारच्या निवडणुकीबद्दल शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

पुणेः पोलीसनामा ऑनलाईन – बिहारच्या निकालांवरून (Bihar Election Result) देशभर प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. सर्व निकाल जाहीर व्हायला रात्री उशीर होणार असला तरी स्पष्ट कल आता जाहीर झाले आहेत. राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बिहारवर आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पवार म्हणाले, बिहारमध्ये तेजस्वी आणि नितीश कुमार यांच्यातच थेट लढत होती. त्यामुळे आम्ही तिथे काही फारसे लक्ष घातले नव्हते. तेजस्वी यादवला आम्ही मोकळीक दिली होती असेही पवार यांनी सांगितले.

पुण्यातल्या हडपसर येथे अ‍ॅमनोरा पार्क टाऊनमधल्या चतुर्भुज शाळेच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते. या कार्यक्रमाला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते.यावेळी पवार म्हणाले की, तेजस्वी यादवने ज्या प्रकारे लढत दिली ती युवकांसाठी प्रेरणा देणारी ठरणार आहे. नितीश कुमारांच्या जेडीयूला मोठा फटका बसेल असेल असे बोलले जात होते मात्र तसे होताना दिसत नाही असंही ते म्हणाले. भाजपला या निवडणुकीत चांगला फायदा झाला असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. बिहारमध्ये भाजपला देवेंद्र फडणवीसांमुळे फायदा झाला असे म्हटले जाते. तुमचे मत काय असा प्रश्न विचारल्यावर पवार आपल्या खास शैलीत म्हणाले, देवेंद्र फडणवीसांमुळे चमत्कार झाला हा प्रकाश तुमच्यामुळे आमच्या डोक्यात पडला.