‘ठाकरे सरकार’मध्ये सत्तावाटपाचा नवा फॉर्म्युला ? ‘हा’ पक्ष ठरला ‘पावर’फुल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाबाबत एक नवा फॉर्म्युला समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीला सर्वाधिक 16 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये उपमुख्यमंत्रिपदाचा समावेश असणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे असले तरीही खरी पॉवर राष्ट्रवादीकडेच राहील असं चित्र आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांच्या नाट्यमय घटनेनंतर अखेर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांच्या सत्तावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदासह सर्वाधिक 16 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. गृहमंत्रिपदासाठीही राष्ट्रवादी आग्रही आहे. शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रिपदासह 15 मंत्रिपदे येतील. तर काँग्रेसला 12 मंत्रिपदे मिळतील, अशी माहिती मिळाली आहे.

महाआघाडीचे सरकार स्थापण्यासाठी निर्णायक भूमिका बजावलेल्या राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद नसले तरी महत्वाची व सर्वाधिक खाती असतील अशी शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळणार असून, त्याबाबतचा निर्णय नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपुष्टात आल्यानंतर म्हणजे 22 डिसेंबरनंतर पक्षश्रेष्ठी घेतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर सहा आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या मध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन आमदारांचा समावेश होता. काँग्रेसच्या नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.