Nagar News : ‘सगळं दिल्यानंतरही अनेक जण सोडून गेले मात्र काही फरक पडत नाही’, शरद पवारांकडून पक्ष सोडून गेलेल्या ‘त्या’ दिग्गजावर टीका

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांविषयी नाराजी व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, राज्याचे नेतृत्व दिले, पक्षाची धुरा दिली तरीही, पक्षाला सोडून गेले. अनेक जण सोडून गेले मात्र काही फरक पडत नाही. पण जनतेने निवडणूक हातात घेतली आणि त्यांचा पराभव झाला, असे म्हणत त्यांनी भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते मधुकर पीचड (Madhukar Pichad) यांच्यावर टीका केली.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शेंडी गावात माजी आमदार कै. स्व. यशवंतराव भांगरे यांच्या पुतळ्याचे अनावर शरद पवार यांच्या हस्ते पार पडले. तसेच यावेळी शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी बोलताना चौफेर टोलेबाजी करत जुन्या आठवणींना उजाळा देऊन पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराजी व्यक्त करत टीका केली.

शरद पवार म्हणाले, स्व. यशवंतराव भांगरे यांनी अकोले तालुक्यासाठी मोठे काम केले आहे. तालुक्याच्या विकासासाठी सगळे एकत्र आले. जशी एकजूट विधानसभेला ठेवली तशीच कायम ठेवा. आपापसात मतभेद ठेवू नका, असा सल्ला त्यानी यावेळी दिला. यावेळी तालुक्यातील अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

मधुकर पिचड यांच्यावर टीका करताना शरद पवार म्हणाले, पक्षात आलेल्या सर्वांना भरभरुन दिले होते. काही जाणांना राज्याचे नेतृत्व दिले, पक्षाची धुरा दिली पण तरीही ते पक्षाला सोडून गेले. अनेकजण सोडून गेले मात्र काही फरक पडत नाही. जनतेने निवडणूक हातात घेतली आणि त्यांचा पराभव झाला असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार पुढे म्हणाले, पवनचक्कीसाठी ज्यांनी आपल्या जमिनी दिल्या त्यांना मदत करत नाही ही खंत आहे. इथल्या साखर कारखान्याने एवढे मोठे कर्ज वाढवून ठेवले आहे. कारखान्याचे अस्तित्व टिकवायचे असेल तर झारीतले शुक्राचार्य बाजूला काढावे लागतील, असे म्हणत पिचड यांच्यावर टीकास्त्र सोडले. एकदा कारखान्याची सत्ता ताब्यात घ्या, मी कारखाना अडचणीतून बाहेर काढतो, अशी ग्वाही देखील शरद पवार यांनी दिली.