रोहित पवारांचा भाजपाला टोला; म्हणाले – नवीन संसद भवनाचं काम पुढे ढकलून लसीकरणाकडे लक्ष देण्यासाठी पाठपुरावा करा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने हाहाकार केला आहे दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक महाराष्ट्रात जुंपली आहे. काही दिवसापूर्वी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी आमदारांच्या हॉस्टेल बांधकामासाठी सरकारने टेंडर काढल्यावरून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली होती. या टिकेवरून आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधानांचे निवासस्थान आणि नवीन संसद भवनाचे काम पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करावा आणि केंद्राला लसीकरणाकडे लक्ष देण्यास सांगावे, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

रोहित पवार म्हणाले, भातखळकरजी आपला मुद्दा मला योग्य वाटतो, परंतु, टेंडर काढलं म्हणजे लगेच पैसे खर्च झाले असं नाही. टेंडर ते कामाचं बील देणं याला किती वेळ लागतो, हे तुम्हाला माहीतच असेल, आमदार निवासाचे म्हणाल तर लांबून येणाऱ्या आमदारांसाठी ते महत्वाचं आहे. तरी देखील मी याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलेन, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले, तुम्हीही २२ हजार कोटींचा सेंट्रल विस्टा प्रकल्प आणि तेरा हजार कोटींचे पंतप्रधान निवासस्थानाचे काम पुढं ढकलून लसीकरणाकडे लक्ष देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला तर लसीकरणाबाबत आपल्या राज्यावरील अन्याय दूर होईल, असा निशाणा सुद्धा रोहित पवार यांनी भातखळकरांवर साधला आहे. तसेच, सध्या राजकारण बाजूला ठेवून आपण लोकप्रतिनिधी म्हणून राज्यातील जनतेला केंद्रस्थानी ठेवून काम करूयात, मी काम करताना राजकारण बाजूला ठेवलं आहे, तुम्हीही एकदा प्रयत्न करुन बघायला काय हरकत आहे?, असे त्यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते अतुल भातखळकर?
आमदारांच्या हॉस्टेल बांधकामासाठी ठाकरे सरकारने ९०० कोटीचे टेंडर काढले आहे. संसद भवनापेक्षा लसीकरणाकडे लक्ष द्या, असा पंतप्रधानांना सल्ला देणाऱ्या रोहित पवारांच्या नजरेतून हे सुटलेलं दिसत आहे. सांगा जरा मुख्यमंत्र्यांना कोरोनाकडे लक्ष द्या म्हणावं. टक्केवारी काय तिथेही मिळेल त्यांना, असे अतुल भातखळकर यांनी ट्विट करून रोहित पवार यांच्यावर टीका केली होती.