राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका नगरसेवकाचं कोरोनामुळं निधन

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख (वय-49) यांचे कोरोनामुळे आज (शुक्रवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, दोन भाऊ, दोन मुले, सून असा परिवार आहे. जावेद शेख यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दुसरा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन झाले होते.

जावेद शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक होते. आकुर्डी भागातून सलग दोनवेळा ते निवडून आले होते. लॉकडाऊनच्या काळात गरजूंना मदत, प्रभागातील सोसायटीमध्ये औषध फवारणी करण्यासाठी व प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी जावेद शेख हे सतत कार्यरत होते. याच दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना आकुर्डीतील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

उपचारादरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्याने बुधवारी रात्री त्यांना तातडीने पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. जावेद शेख यांना 16 जुलै रोजी कोरोनाची लागण झाली होती.