Video : शरद पवारांनी U-Turn घेतल्याच्या PM मोदींच्या टीकेला सुप्रिया सुळेंनी दिलं ‘हे’ उत्तर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा कृषी कायद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या टीका केली. बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत बोलताना मोदी म्हणाले, शरद पवार आज अचानक उलट बोलत आहेत. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे सभागृहात उपस्थित होत्या. मोदींनी पवारांवर केलेल्या टीकेला सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?
मोदींच्या टीकेला उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मोदींनी आमच्या पक्षाच्या प्रमुखांमवर टीका केली,. मी उभी राहून त्यांना थांबवू शकत होते. पंरतु ती आमची संस्कृती नाही. मला काही कागदपत्रं आणि तथ्य समोर मांडायचे आहेत. भाजप सदस्य असले तरी ते देशाचे पंतप्रधान असल्यानं त्यांनी सभागृहात मांडलेला मुद्दा गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांनी राज्याला लिहिलेल्या पत्राचा दाखला दिला. परंतु त्यावेळी त्यांनी राज्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे अंमलबजावणी केली जावी हे वाचलं नाही.

पुढं बोलताना सुळे म्हणाल्या, मोदींनी युटर्न हा शब्द वापरला त्यामुळं मला सरकारनं घेतलेल्या युटर्न बद्दल सांगायचं आहे. मनमोहन सिंग सरकारनं जीएसटी आणलं होतं. तेव्हा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला विरोध केला होता. आम्ही आरटीआय, अन्न सुरक्षा, शिक्षण हक्क, आधार, मनरेगा अशी अनेक विधेयकं आणली. बदल झाला पाहिजे यावर आमचा विश्वास आहे. जेव्हा ही विधेयकं आणण्यात आली तेव्हा सर्वांशी चर्चा करून, त्यांचं मत मागवूनच कायदे करण्यात आले. मनरेगामुळं कोरोना संकटात नोकरी गेलेल्यांना रोजगार मिळाला. आधारलाही विरोध करण्यात आला होता. आज ते जीएसटी, मनरेगा आणि आधारवरून आपली पाठ थोपटत आहेत. आता हा नेमका कोणता टर्न आहे मलाही माहित नाही अशी टीकाही त्यांनी केली.

सुप्रिया सुळे असंही म्हणाल्या, पंतप्रधानांनी इंटेट आणि कंटेट असा उल्लेख केला. त्यांनी केलं तर इंटेट आणि कंटेट, आम्ही केलं तर युटर्न हे थोडं चुकीचं वाटत आहे. त्यातही खास करून जेव्हा इतक्या मोठ्या व्यक्तीकडून येतं तेव्हा.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, शरद पवारांनी त्यावेळी कायदा बदलण्याची शिफारस केली होती. तोच मार्ग सरकारनं का निवडला नाही. जर हे पत्र सर्व मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं तर मग शरद पवार कृषीमंत्री असताना एकही आंदोलन का झालं नाही. मी त्यांची बाजू मांडत नाही, तेवढी क्षमता त्यांच्याकडे आहे. परंतु मला काही तथ्य मांडायचं कारण पंतप्रधानांनी त्यांचं नाव घेतलं.