२०२० मध्ये NDAला राज्यसभेतही स्पष्ट बहुमत ; विधेयक पास करण्यास येणार नाही अडचण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था-  लोकसभा निडणुकीत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व यश मिळवले आहे. एनडीएतील मुख्य पक्ष असलेल्या भाजपनेच स्वबळावर तब्बल ३०३ जागा मिळवल्या आहेत. लोकसभेत मिळवलेल्या अभूतपर्व यशानंतर भाजप आता राज्यसभेकडे मोर्चा वळवण्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षात लोकसभेत बहुमत असले तरी भाजपला राज्यसभेत बहुमत नव्हते.

२४५ सदस्य संख्या असलेल्या राज्यसभेत बहूमतासाठी १२३ खासदारांची आवश्यकता असते. मात्र आजच्या घडीला एनडीएकडे १०२ सदस्य आहेत. एनडीएचे राज्यसभेत बहुमत होण्यासाठी २१ सदस्यांची गरज आहे. भारतीय जनता पक्षाची बहुतांश राज्यामध्ये सत्ता असल्यामुळे नोव्हेंबर २०२० पर्यंत राज्यसभेत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळू शकते. भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेत सध्या ७३ सदस्य आहेत. येणाऱ्या काळात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये राज्यसभेतील १० जागा तर २०२० मध्ये ७२ जागा कमी होणार आहेत. भाजपची सत्ता असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये २०२० ला राज्यसभेच्या १० जागा तर महाराष्ट्रात ७ जागा कमी होणार आहेत.

शिवाय राज्यसभेतील १२ जागांवर राष्ट्रपतींकडून सदस्यांची नेमणूक केली जाते. तसेच भारतीय जनता पक्षाची सत्ता पुढील पाच वर्षे असल्यामुळे अनेक घटक पक्ष एनडीएमध्ये सामील होण्यास उत्सुक आहेत. नुकतेच आंध्रप्रदेश विधानसभेवर वायएसआर काँग्रेसची सत्ता आली आहे. वायएसआर काँग्रेसचे नेते आणि आंध्रप्रदेशचे भावी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत म्हणजे वायएसआर काँग्रेसचा देखील या सरकारला पाठींबा असेल.

ही सर्व परिस्थिती पाहता येणाऱ्या एक ते दोन वर्षात एनडीएला राज्यसभेत सहज बहुमत मिळू शकते. राज्यसभेत एनडीएला बहुमत मिळाल्यास कोणतेही विधेयक पास करायला मोदी सरकारला कसलीही अडचण येणार नाही.