धक्कादायक ! रुग्णाला होत होती ‘गर्मी’, कुटुंबियांनी ‘कुलर’ सुरू करण्यासाठी काढला व्हेंटिलेटरचा ‘प्लग’, पेशंटचा मृत्यू

कोटा : वृत्त संस्था – राजस्थानच्या कोटामध्ये एका सरकारी दवाखान्यात एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. एका नातेवाईकाने कुलर सुरू करण्यासाठी व्हेंटिलेटरचा प्लग काढला. या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग असल्याचा संशय असल्याने 13 जूनरोजी महाराव भीम सिंह (एमबीएस) हॉस्पिटलमध्ये अति दक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र, नंतर तपासात तो रूग्ण कोरोना पॉजिटीव्ह नसल्याचे आढळले होते.

रुग्णालयातील अधिकार्‍यांनी सांगितले की, तीन सदस्यांची समिती या घटनेची चौकशी करणार आहे. आयसीयूमधील आणखी एका रुग्णाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या व्यक्तीला आयसोलेशन वॉर्डमध्ये पाठविण्यात आले.

आयसोलेशन वॉर्डमध्ये खूप उष्णता जाणवत असल्याने, एका नातेवाईकाने एअर कूलर आणला. त्याला कुलर लावण्यासाठी सॉकेट न सापडल्याने त्याने व्हेंटिलेटरचा प्लग काढला आणि कुलरचा प्लग लावला. सुमारे अर्ध्या तासानंतर व्हेंटिलेटरची वीज संपली.

डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांना ही माहिती तातडीने देण्यात आली, त्यांनी रुग्णावर सीपीआरचा प्रयत्न केला, परंतु त्याचा मृत्यू झाला होता. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नवीन सक्सेना म्हणाले की, तीन सदस्यांची समिती या घटनेची चौकशी करेल, ज्यात नर्सिंगचे उपाधीक्षक, नर्सिंग अधीक्षक आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश आहे. शनिवारी समिती आपला अहवाल सादर करेल.

ते म्हणाले की, समितीने प्रभागातील वैद्यकीय कर्मचार्‍यांचे जबाब नोंदवले आहेत, पण मृतांचे नातेवाईक समितीला प्रतिसाद देत नाहीत. सक्सेना म्हणाले की, जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. समीर टंडन यांनी समितीने केलेल्या चौकशीवर भाष्य करण्यास नकार दिला. ते म्हणाले, की तपास सुरू आहे.

या घटनेसंदर्भात रुग्णालयातील अधिकार्‍यांनी सांगितले की, रूग्णाच्या कुटुंबाने कूलर बसविण्याची परवानगी घेतली नव्हती आणि जेव्हा रुग्ण मरण पावला तेव्हा त्यांनी कर्तव्यावर असलेल्या निवासी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांशी गैरवर्तन केले.