‘या’ नवीन फॉर्म्युल्यानुसार सत्ता स्थापन करणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून सत्ता स्थापनेचा पेच सुटत नव्हता त्यास अखेर पूर्णविराम मिळाला असून सत्तास्थापनेच्या नवीन फॉर्मुल्यावर काँग्रेस कार्यकारिणीने शिक्कामोर्तब केले आहे. या नवीन आघाडीचे नामकरण देखील करण्यात असून शिवसेनेने सुचविलेले महाशिवआघाडी हे नाव काँग्रेसला मान्य नसल्याने महाविकासआघाडी असे नाव देण्यात आले असे सूत्रांकडून समजले. किमान समान कार्यक्रमासाठी तिन्ही पक्षांनी आपल्या नेत्यांच्या स्वाक्षऱ्या केल्या असून समन्वयासाठी एक समन्वय समितीची स्थापना देखील केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सत्तेचा नवीन फॉर्म्युला तयार झाला असून 11-11-11 या सूत्रानुसार सत्तेचं वाटप करण्याचे ठरले आहे असे समजते. तसेच काँग्रेस थेट शिवसेनेला पाठिंबा न देता राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंब्याचे पत्र देणार आहे. मिळालेल्या सूत्रांनुसार काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे.

मुख्यमंत्रिपदाची विभागणी होणार का?
अखेर सत्तास्थापनेचा पेच सुटला आणि ५०-५० फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या जागांमध्ये फारसा काही फरक नसल्याने राष्ट्रवादीकडून अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची मागणी केली जात होती. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही याबाबत सूत्रांशी बोलताना सांगितले की, ५०-५० फॉर्म्युल्याच्या आधारे पहिल्या टर्ममध्ये शिवसेनेचा आणि दुसऱ्या टर्ममध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल अशी चर्चा बैठकीत झाल्याचे सांगितले.

दरम्यान, काही वरिष्ठ नेत्यांकडून एक वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावाबाबत माहिती मिळाली आहे. आगामी मंत्रिमंडळात आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी अनुभवी नेत्यांच्या खांद्यावर धुरा देण्याचे ठरविले असून अनेक नेते पुन्हा नव्या मंत्रिमंडळात सामील होण्याची चिन्ह दिसत आहेत.

शिवसेनेच्या मागणीमुळे वाद
शिवसेनेबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी युती करण्यास तयार झाली असता एक नवीन वाद समोर आला असून त्याबाबतीत शिवसेना कोणते पाऊल उचलते हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत शिवसेना सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच वीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी लोकसभेत वीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी लावून धरली आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी सोबत शिवसेना सत्तेचं समीकरण जोडणार आहे. परंतु असे असताना शिवसेनेला हिंदुत्वाला आणि वीर सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीला बाजूला ठेवावे अशी काँग्रेसने अट घातली आहे असे सुत्रांकडून समजते. आता नव्याने निर्माण झालेल्या महाविकास आघाडीची गाडी पुढे जाते की मग या वादामुळे ब्रेक लागतो हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Visit : Policenama.com