नगर एलसीबीची नगर-पुणे सीमेलगत आर्वी गावात धाडसी कारवाई : सव्वाकोटींचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगर-पुणे जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या आर्वी गावात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने आज दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास धाडसी कारवाई केली. भीमा नदीपात्रातून वाळू उपसा करणारे 7 जेसीबी, 6 ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच दोघांना अटक करण्यात आली असून, इतर पसार झाले आहेत.

भीमा नदी पात्रातील आर्मी गावात वाळूचा खुलेआम उपसा होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. त्यावरून पोलीस कर्मचारी विजयकुमार विठेकर, विनोद माशाळकर आदींच्या पथकाने अतिशय गुप्तपणे शेतातून जाऊन एकाच वेळी सुमारे दहा-अकरा कर्मचाऱ्यांच्या पथकाने भीमा नदी पात्रात छापा टाकला.

वाळू तस्करांची नेटवर्क स्ट्रॉंग असल्याने पोलिसांनी संशय येऊ नये, यासाठी खासगी वाहनाने एकएकट्याने जाऊन एकाच वेळी छापा टाकला. पोलीस आल्याचे समजतात वाहने जागेवरच सोडून चालक व इतर कर्मचारी पळून गेले. दोन चालक पोलिसांच्या हाती लागले आहेत. तेथून सात जेसीबी व सहा ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. यात सुमारे सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

आज दुपारी सव्वादोन वाजण्याच्या ही कारवाई करण्यात आली. सदर कारवाईमुळे भीमा नदीपात्रात वाळूतस्करी करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. कारवाईनंतर श्रीगोंदा पोलिसांना पाचारण करण्यात आले. सदर वाहने जप्त करून वाळूतस्करांविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दुपारी उशिरापर्यंत पोलिसांकडून घटनास्थळ पंचनामा सुरू होता.