तू कसा आमदार होतो तेच बघतो ! ; भरसभेत अजित ‘दादां’ ची स्टाईलगिरी 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विजय शिवतारे यांना जळजळीत इशारा दिला. “विजय शिवतारे आता पोपटासारखा बोलायला लागलाय … तू यंदा कसा आमदार होतो तेच बघतो, अजित पवारने एकदा ठरवलं की एखाद्याला आमदार होऊ  द्यायचं नाही तर तो आमदार होतच नाही … ” असे म्हणत अजित पवार यांनी भरसभेत शिवतारे यांना जळजळीत इशारा दिला. खासरदार सुप्रिया सुळे यांची रविवारी बारामती येथे शेवटची सभा पार पडली यावेळी अजित पवारांनी शिवतारे यांच्यावर हल्लाबोल केला.

यावेळी बोलताना अजित पवार यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर देखील टीका केली ते म्हणाले, ” तुझी डिग्री काय ? तु बोलतो काय ? तुझ्या नावातच विनोद आहे. तू शिक्षणमंत्री आहे ना तिकडे जरा लक्ष दे की… अशा शब्दात विनोद तावडेंवर पवारांनी टीका केली.

पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे पवार

यावेळी पुढे बोलताना पवार म्हणाले, विरोधक पवार साहेबांवर टीका करतात. पवारांनी काय केलं? असा सवाल करतात पण हे  विचारत असताना, ज्या रस्त्याने ते बारामतीत आले ते रस्ते सुद्धा राष्ट्रवादी, काँग्रेस आणि बारामतीकरांनी बांधले आहेत. हे लक्षात ठेवा ! ‘पवार साहेब म्हणजेच बारामती आणि बारामती म्हणजेच पवार साहेब’ म्हणून सारं जग बारामतीला ओळखतं, असेही पवार म्हणाले.