इंदापूरला खडकवासल्याचे पाणी सोडण्याची काँग्रेसची मागणी

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला असताना, इंदापूर तालुका अद्याप कोरडाच आहे. तालुक्यातील शेतीसाठी निरा डावा कालवा व खडकवासला कालव्यातून तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी इंदापूर तहसीलदार सोनाली मेटकरी यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

तसेच तालुक्यातील सर्व तलावांमध्ये पाणी सोडण्यात यावे. पेट्रोल-डिझेल दर कमी करण्यात यावेत आदी मागण्यांही शासनाकडे करण्यात आलेल्या आहेत. या मागणीबाबतचे निवेदनाच्या प्रती राज्यपाल, मुख्यमंत्री, पालकमंत्री, जलसंपदा मंत्री आदींना पाठविण्यात आल्या आहेत. इंदापूर तालुक्याच्या हक्काचे पाणी गेल्या साडे चार वर्षांत इंदापूर तालुक्याला मिळाले नाही.

सध्या तालुक्यात पिण्याचे पाणी तसेच जनावरांना चारा टंचाई जाणवत आहे. शेतातील पिके जळून गेल्याने तालुक्यात शेतीसाठी पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. खडकवासला धरण व निरा खोऱ्यातील भाटघर आणि इतर धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा निर्माण झाल्याने इंदापूर तालुक्यामध्ये पिण्यासाठी पाणी व चारा पिके आणि शेतातील उभ्या पिकांसाठी तातडीने आवर्तन देण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

खडकवासला कालव्यातून लाभक्षेत्रातील तरंगवाडी, पोंदकुलवाडी, बिजवडी, कौंठळी, न्हावी, रूई, पळसदेव, काळेवाडी, डाळज, कळस, भादलवाडी, पोंधवडी, मदनवाडी, अकोले, निरगुडे, शेटफळ गढे, म्हसोबावाडी येथील पाझर तलाव भरून घेण्यात यावेत. निरा डावा कालव्यातून शेटफळ हवेली, अंथुर्णे, वरकुटे खुर्द, वडापुरी, वाघाळा या तलावांमध्ये तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी तालुका काॅग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. कृष्णाजी यादव, इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, मंगेश पाटील, कैलास कदम, बापू जामदार, धनंजय पाटील, महेंद्र रेडके, हनुमंत बनसोडे, निवृत्ती गायकवाड, तुळशिराम चोरमले, सुभाष काळे, मच्छींद्र अभंग, मेघ:शाम पाटील, रघुनाथ राऊत, पिंटू काळे, गोरख शिंदे, वैभव गोळे, प्रवीण देवकर, बाळासाहेब शिंदे इत्यादी काॅग्रेस कार्यकर्त्यांच्या प्रमीख उपस्थितीत तहसीलदार सोनाली मेटकरी यांना निवेदन देण्यात आले.

You might also like