दुष्काळ : मंत्र्यांच्या आदेशाकडे अधिकाऱ्यांचा कानाडोळा

संबंधितावर कारवाई करा : किसान सभेची मागणी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – दुष्काळामुळे मराठवाडा आणि विदर्भासह राज्य होरपळून निघत आहे. मात्र आचारसंहितेचे कारण पुढे करत प्रशासनातील काही अधिकारी मंत्र्यांनी दिलेल्या दुष्काळी उपाययोजनांच्या आदेशाकडे कानाडोळा करीत आहेत. अशा कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

दुष्काळात मराठवाडा, विदर्आभासह संपूर्ण महाराष्ट्र होरपळत आहे. अधिकारी जर आचारसंहितेच्या नावाखाली उपाययोजना दाबत असतील, तर किसान सभा आणि शेतकऱ्यांची मुले हे खपवून घेणार नाहीत. मंत्र्यांचेच न ऐकणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरकारने कडक कारवाई केली पाहिजे, असे नवले म्हणाले.

चारा छावण्यांची देयके रखडली

सरकार एकीकडे चारा छावणी चालकांचे देयके देत नाही. चारा-पाण्याची टंचाई आहे. उष्माघाताने लोकं-जनावरे दगावत आहेत, अशा भीषण परिस्थितीचे गांभीर्य सरकार आणि अधिकाऱ्यांनी ओळखून तातडीने उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी मागणीही नवले यांनी केली आहे.