पुणे जिल्ह्यातील ‘त्या’ बनावट डांबर कारखान्याचे धोगेदोरे थेट हैद्राबादपर्यंत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील औद्योगिक परिसरातील बनावट डांबर कारखान्याचे धागेदोरे थेट हैदराबादपर्यंत जाऊन पोहचले आहेत. मुंबईहून हैदराबादकडे डांबर घेऊन जाणारे टँकर वाटेत येथे थांबून त्यातील पाचशे किलो ते २ टनापर्यंतचे ओरिजनल डांबर काढून घेऊन त्याच्या ऐवजी या कारखान्यात बनविण्यात आलेले बनावट डांबर मिक्स करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहतीत अनेक बनावट कारखान्यांचा सुळसुळाट झाला आहे. रसायनविक्रीच्या माध्यमातूनदेखील मोठी उलाढाल या परिसरात होत असते. भंगार, बांधकाम व्यवसाय, ड्रग्ज असे एक ना अनेक व्यवसाय सध्या करणाऱ्या टोळ्या या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत. यापूर्वी या परिसरातील कारखान्यात कोट्यावधीचे मॅफेडॉन या अमली पदार्थाची निर्मिती केली जात असल्याचे मुंबई पोलिसांनी उघडकीस आणले होते.

कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक परिसरात नुकतेच बनावट डांबर बनवणाऱ्या एका खासगी कंपनीवर पोलिसांनी छापा टाकून दोघांना अटक केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, चेंबूर येथून हैदराबादला जाताना कुरकुंभ या ठिकाणी मूळ डांबर काढून कंपनीतून बनावट डांबर भरून टँकरचालक चोरीच्या माध्यमातून अशा प्रकारचे काम करीत आहेत. टँकरमधून काढून घेतलेले मूळ डांबर लोकल ठिकाणी विक्री केली जात आहे. सध्या बनावट डांबर बनवणारे व त्यांना मदत करणारे टँकरचालक यांना अटक केली असून यामध्ये अधिक तपास करण्यात येत आहे.