जेष्ठ नागरिकाला घातला पावणे दोन लाख रुपयांना गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पार्टटाईम सिनीअर क्वॉलिटी कन्सलटंट म्हणून जॉब देण्याची बतावणीकरून जेष्ठ नागरिकाला पावणे दोन लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ६६ वर्षीय जेष्ठ नागरिकाने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जेष्ठ नागरिक एका खासगी कंपनीतून सेवानिवृत्त झाले आहेत. घरी बसून वेळ शिल्लक राहत असल्याने त्यांना पार्ट टाईम नोकरी करण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी ऑनलाईन नोकरी साईटवर नोकरीसंदर्भात माहिती घेतली होती.

दरम्यान, ६ ऑक्टोबरला त्यांना फोन आला. तसेच जॉब एजन्सीतून बोलत असल्याची बतावणी केली. सणसवाडीतील प्लॉन्टमध्ये सिनीअर क्वॉलिटी कन्सलटंट म्हणून पार्ट टाइम नोकरी देण्याचे आमिष दाखविले.

त्यासाठी विविध कागदपत्रांसह फीसाठी त्यांच्याकडून ऑनलाईन १ लाख ७३ हजार रुपये स्वतःच्या बँकखात्यात वर्ग करुन घेतले. पैसे जमा करुनही नोकरी न लागल्यामुळे फसवूणक झाल्याचे लक्षात आले. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक अनिल शेवाळे करीत आहेत.

Visit :  Policenama.com