आर्मीत नोकरीला असल्याचे सांगत ‘चेक’ देऊन नागरिकांचे मोबाईल ‘लंपास’, 7 जणांना गंडविलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आर्मीत नोकरीला असल्याचे सांगत चेक देऊन नागरिकांचे मोबाईल लंपास करून फसवणूक करणाऱ्यास गुन्हे शाखेने अटक केली आहे. तो ओएलएक्सवर मोबाईल विक्रीची जाहिरात दिलेल्या व्यक्तींना संपर्क साधत असे. त्यांना पैसे नसणाऱ्या खात्याचे चेक देत असे. त्याने सात जणांना फसविले आहे.

राहूल अरूण सिद्धू (वय ४२, रा. ससाणेनगर, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. फिर्यादी ऋषिकेश सोमसे याने त्याचा मोबाईल विक्रीची जाहिरात ओएलएक्सवर दिली होती. त्यावेळी आरोपी सिद्धूने त्याला संपर्क केला. त्याचा मोबाईल खरेदी करायचा असल्याचे सांगितले. त्यानुसार घोरपडी गाव येथे त्याला भेटण्यासाठी बोलविले. भेटल्यानंतर आरोपी सिद्धू याने तो आर्मीमध्ये असल्याचे सांगितले. त्याचा मोबाईल घेऊन त्याला पैसे नसलेल्या बँक खात्याचा चेक दिला. चेक बँकेत टाकला असता तो बाऊन्स झाला. त्यामुळे त्यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली होती. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस कर्मचारी अमोल पवार यांना माहिती मिळाली, की ओएलएक्सवरील नागरिकांचे मोबाईल लंपास करणारा आरोपी हा ससाणेनगर येथे आहे. त्यानुसार पथकाने सिद्धू याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला अटक करत कोर्टात हजर केले असता कोर्टाने सात जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचा आदेश दिला. त्याने आणखी काही जणांची अशाच पद्धतीने फसवणूक केल्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.

त्याच्यावर नगरमधील भिंगरी, नेवासा, शिर्डी, एमआयडीसी पोलिस ठाण्यात अशाच पद्धतीने फसवणूक केल्याचे सात गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/