भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या गौतम गंभीरची संपत्ती ‘गंभीर’च ; रुपये १,४७,००,००,०००

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेटच्या मैदानावर कर्तृत्व गाजवणारा भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आता राजकिय मैदानात उतरला आहे. भाजप पक्षात त्याने प्रवेश केला असून त्याला पूर्व दिल्लीतून उमेदवारी देखील देण्यात आली आहे. त्याने नुकताच आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्याने आपल्या स्थावर आणि जंगम संपत्तीची माहिती दिली. एकूण १,४७,००,००,००० रुपयांच्या संपत्तीचा तो मालक असल्याचे समोर आले आहे. सध्या गंभीरने जोरदार प्रचार देखील करायला सुरुवात केली आहे.

२०१७-१८ च्या प्राप्तिकर परतावात गांभीरने त्याचे उत्पन्न १२. ४० कोटी असल्याचे जाहीर केले आहे. तर त्याची पत्नी नताशा हिच्या प्राप्तिकर परतावात ६.१५ लाखाचे उत्पन्न दाखवण्यात आले आहे. गंभीरने जंगम आणि स्थावर मालमत्ता मिळून १४७ कोटीची संपत्ती असल्याचे म्हंटले आहे. गौतम गंभीरच्या घरी ५ चारचाकी गाड्या तर एक दुचाकी गाडी असल्याचे त्याने नमूद केले आहे. विशेष म्हणजे गंभीरने जाहीर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार तो दिल्लीतील सर्वाना श्रीमंत उमेदवार ठरला आहे.

तर दुसरीकडे पश्चिम दिल्ली मतदार संघातून काँग्रेसच्या तिकीटावर उभे असलेले महाबल मिश्रा हे दुसरे श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांनी ४५ कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत १२ कोटींची वाढ झाली आहे.