भारतात ‘टीबी’मुळे मरणाऱ्या एचआयव्हीग्रस्तांचा आकडा कमी करण्यात यश

पुणे : पोलीसनामा ऑनसाईन – भारतात क्षयरोगामुळे मृत्यू होणाऱ्या एचआयव्हीग्रस्तांचा आकडा तब्बल ८४ टक्क्यांपर्यंत घसरल्याची माहिती संयुक्त राष्ट्राच्या ‘एचआयव्ही-एड्स’ (यूएनएड्स) मोहिमेने दिली. ‘भारताला ‘टीबी’मुळे मृत्यू होणाऱ्या ‘एचआयव्ही’ग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण ८४ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात यश मिळाले आहे. हा आकडा जगातील अन्य २० देशांच्या तुलनेत सर्वात मोठा असून, भारताने हे यश २०२० च्या आपल्या पूर्वनियोजित उद्दिष्टापेक्षा ३ वर्षे अगोदरच २०१७ मध्ये प्राप्त केले आहे.

असे ‘यूएनएड्स’ने म्हटले आहे. ‘यूएनएड्स’ने जागतिक क्षयरोगविरोधी दिनानिमित्त जागतिक समुदायाला ‘टीबी’मुळे मरण पावणाऱ्या एचआयव्हीग्रस्तांचा आकडा ७५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी वेगवान पावले उचलण्याचे आवाहन केले. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, २०१० नंतर टीबीमुळे मृत्यू होणाऱ्या एचआयव्हीग्रस्तांच्या मृत्यूचा आकडा तब्बल ४२ टक्क्यांनी घटला आहे. २०१० ते २०१७ पर्यंत हा आकडा ५ लाख २० हजारांहून थेट ३ लाखांपर्यंत घसरला आहे. ‘टीबी आता कालबाह्य आजार झाला पाहिजे. गत अनेक दशकांपासून त्यावर उपचार उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यावर सहज मात शक्य आहे.

जगभरातील अनेक देशांनी गरिबांच्या मूलभूत आरोग्य सोयी-सुविधा, भोजन व निवाऱ्याच्या अधिकारांकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष केल्यामुळे क्षयरोगाला आपले पाय पसरण्याची संधी मिळाली आहे,’ असे ‘यूएनएड्स’चे कार्यकारी संचालक मायकल सिडिबी यांनी म्हटले आहे. ‘एचआयव्हीग्रस्तांना हा आजार होण्याची मुख्य भीती असते. आजही अनेक देशांकडे हे लक्ष्य पूर्ण करण्याची संधी आहे. आता टीबी व एड्समुक्त जग निर्माण करण्याची वेळ आली आहे,’ असेही ते यावेळी म्हणाले.