‘त्या’ पोलीस निरीक्षकाची बदली करा ; RPI चा तहसील कार्यालयावर मोर्चा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्याकडून दलित समाजातील पीडितांना न्याय मिळत नाही. त्यांच्याकडून जाणून बुजून त्रास दिला जातो. त्यामुळे त्यांची तातडीने इतरत्र बदली करावी, या मागणीसाठी आरपीआय आठवले गटाच्यावतीने कर्जत तहसील कार्यालयावर मोर्चा काल काढण्यात आला होता.

जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या नेतृत्वाखाली हलगी वाजवत कर्जत शहरात मोर्चा काढून तहसील कार्यालयावर आणण्यात आला. यावेळी बोलताना साळवे म्हणाले की, कर्जत तालुक्यात अनेक प्रकरणात कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक चव्हाण हे दलित समाजाविरोधात भूमिका घेतात. अनेक पीडितांना न्याय न देता त्यांनाच आरोपी केले जाते. याचा निषेध म्हणून आरपीआयच्यावतीने तहसील कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्यावर कारवाई न झाल्यास कर्जत बंद करू, असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी अनेक तक्रारदारांकडून आपले अर्ज तहसीलदारांना एकत्रितपणे देण्यात आले आहेत. याबाबत आता पोलीस अधीक्षक नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चव्हाण नेहमीच वादग्रस्त

पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण हे जिल्ह्यात आल्यापासून वादग्रस्त ठरले आहेत. पाथर्डी पोलीस ठाण्यात पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी रचलेल्या कटाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यांचे पाथर्डी व कर्जत या दोन्ही पोलिस ठाण्याची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

कोल्हापूरचं हृद्य धडधडतंय पुण्यात

डासांमुळे होणाऱ्या या आजारांना ‘घरगुती’ पद्धतीने घाला आळा.

हाताला ६ बोटे असणे असते फायद्याचे

मेकअप रिमूव्ह करुन झोपा नाहीतर त्वचेला होईल नुकसान

 

 

You might also like