केडगाव गावठाणातील गायरान जमिनीवर धनदांडग्यांच्या कब्जा, ग्रामपंचायतीची बघ्याची भूमिका

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील केडगाव गावठाण येथे धनदांडग्यांनी गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे करण्यास सुरुवात केली असून या धनदांडग्यांना रोखण्यात केडगाव ग्रामपंचायत मात्र सपशेल अपयशी ठरत आहे विशेष म्हणजे ज्यांनी केडगाव गावठाणातील गायरान जागेमध्ये अतिक्रमण केले आहे ते सर्वजण आलिशान घरांचे आणि शेतजमिनींचे मालक असल्याचे आता समोर येत आहे त्यामुळे केडगाव ग्रामपंचायत या धनदांडग्यांच्या पैसा आणि पावर पुढे झुकत असल्याचा आरोप येथील सर्वसामान्य नागरिक करू लागले आहेत.

काही महाभागांनी तर या गायरान जमिनीच्या मध्यातून गेलेल्या डांबरी रस्त्याच्या बाजूलाच जागा पकडून तेथे फाउंडेशन आणि कंपाउंड केलेले आहे. या मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या जागेची किंमत हि गुंठ्याला दहा लाख ते पंधरा लाख इतकी आहे परंतु शासनाच्या जागेवर इतका मोठा डल्ला मारल्यानंतरही ग्रामपंचायतने मात्र निद्रा अवस्थेचे सोंग घेतल्याचे दिसत आहे.

गायरान जागेत घरे बांधून ती अन्य व्यक्तींना लाखो रुपयांना विकण्याचा धंदा तेजीत…
या गायरान जमिनीच्या जागेमध्ये होत असलेल्या अतिक्रमण आणि घरांच्या बांधकामांची पोल आता खुलत असून या जागेमध्ये ठराविक व्यक्ती राजकीय पुढाऱ्यांना आणि काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून अगोदर अतिक्रमण करतात त्या नंतर तेथे पक्की घरे बांधून ती घरे बाहेरून आलेल्या व्यक्तींना दुप्पट किंमतीला विकण्याचा धंदा सध्या जोरात सुरू झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतजमीन आणि आलिशान घरे असणाऱ्या धनदांडग्यांचा गायरान जमिनीमध्ये अतिक्रमण करून जागा अडविण्याचा आणि घरे बांधण्याचा हेतू आता उघड होत आहे त्यामुळे आता केडगाव ग्रामपंचायत आणि शासन यामध्ये नेमकी कोणती भूमिका घेते याकडे केडगावच्या नागरिकांचे लक्ष लागले आहे.

ग्रामपंचायतीच्या करवाईकडे ग्रामस्थांचे लागले लक्ष…
गायरान जमिनींवरील बांधकामांना मदत करणाऱ्या सरपंच अथवा ग्रामपंचायत सदस्यांना निवडणुक लढविता येता कामा नये यासाठी त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याची सूचना गिरीश बापट हे पालकमंत्री असताना देण्यात आल्या होत्या परंतु या आदेशांना या ठिकाणी हरताळ फासला जात असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.

केडगावच्या गायरान जमिनींवरील होत असलेली अतिक्रमणे आणि ग्रामपंचायतीची भूमिका याबाबत केडगावचे विद्यमान सरपंच अजित शेलार यांना विचारले असता माहिती घेऊन सांगतो असे उत्तर त्यांनी दिले आहे. एकंदरीतच केडगावचे विद्यमान सरपंच हे केडगाव गावठाणामधीलच रहिवासी असून त्यांनी या गायरान जागेमध्ये झालेल्या अतिक्रमानाबाबत ठोस कारवाईची भूमिका घेऊन झालेली अतिक्रमणकरून बांधण्यात आलेली फाउंडेशन, अर्धी घरे, कंपाउंड, पत्रा शेड हे जमीनदोस्त करावीत अशी मागणी केडगावमधील सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे. तर याबाबत आता केडगाव ग्रामपंचायत कारवाईबाबत काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

You might also like