दौंडमध्ये मतदारांना पैसे वाटप करण्याचा धक्कादायक प्रकार उघड

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन – लिंगाळी ता.दौंड येथे मतदारांना पैसे वाटण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला या प्रकाराची माहिती मिळाली होती. परंतु पथक पोचण्यापूर्वी पैसे वाटणारे पसार झाले असल्याचे समोर येत आहे. पैसे वाटप करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले असून लिंगाळी येथील पासलकर वस्ती येथील मतदान केंद्राजवळ हा प्रकार सुरू होता.

वंचित बहुजन आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांनी याबाबत संबंधितांना जाब विचारताच पैसे वाटप थांबवून त्यांनी काढता पाय घेतला. याची माहिती भरारी पथकास मिळताच ते सदर जागेवर दाखल झाले. परंतु त्यांना पैसे वाटणारे आढळून आले नाही असे दौंडचे मुख्याधिकारी विजयकुमार थोरात यांनी सांगितले.

याबाबत दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी म्हणाले, अजून कोणाचीही लेखी तक्रार आलेली नाही. परंतु तक्रार आल्यास आणि पैसेवाटप होत असल्याचे सिद्ध झाल्यास कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.