शिवसेना-भाजपला 30 जागांवर बंडखोरांचा ‘फटका’ ? पुण्यासह 20 जागांवर अटीतटीची ‘लढाई’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सेना भाजप युती झाल्यानंतर दोनीही पक्षांना बंडखोर उमेदवारांना सामोरे जावे लागत आहे. शिवसेनेमधून अनेक शिवसैनिकांनी बंडखोरी करायला सुरुवात केली आहे त्याचप्रमाणे भाजपलाही अनेक बंडोबांना सामोरे जावे लागत आहे. एकूण ३० जागांवरील बंडखोरांचं मन वळविण्यात दोन्ही पक्षाला यश आलेलं नाही. त्यामुळे या जागांवर युतीला मोठा फटका बसू शकतो.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली आहे. शिवसेनेने सावंत यांचं तिकीट कापून या मतदारसंघातून महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना तिकीट दिलं आहे. महाडेश्वर हे शिवसेनेचे सचिव अनिल परब यांच्या जवळचे असल्यानेच सावंत यांचा पत्ता कापल्या गेल्याचं बोललं जातंय.

वर्सोवामधून विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या भारती लव्हेकर यां निवडणूक लढवत आहेत. मात्र शिवसेनेच्या नगरसेविका राजूल पटेल यांनी वर्सोवा मतदारसंघातून बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे लव्हेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अशा अनेक ठिकाणी बंडखोरांचा उदय हा युतीसाठी घातक ठरणार आहे.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचीही शिवसेनेच्या बंडखोरामुळे डोकेदुखी वाढली आहे. बागडे यांच्या विरोधात सेनेच्या रमेश पवार यांनी उमेदवारी दाखल केली आहे.

अंधेरी पूर्वमध्ये भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांनी शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. रामटेकमध्ये शिवसेनेचे माजी आमदार आशिष जैस्वाल यांनी भाजपचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डींविरोधात उमेदवारी अर्ज भरला आहे.

कोकणात तर मोठ्या प्रमाणावर शिवसेना विरुद्ध भाजप असाच संघर्ष होताना दिसत आहे. सिंधुदुर्गात भाजप आणि शिवसेना एकमेकांविरोधात लढत आहे. शिवसेनेचे सतीश सावंत यांनी भाजपचे उमेदवार नितेश राणेंविरोधात उमेदवारी अर्ज भरला आहे. सावंतवाडीत भाजपचे कार्यकर्ते राजन तेली यांनी शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांच्याविरोधात उमेदवारी दाखल केली आहे. तसेच कुडाळमध्ये भाजपचे रणजीत देसाई यांनी शिवसेनेचे उमेदवार आणि आमदार वैभव नाईकांविरोधात बंडखोरी केली आहे.

पुण्यासह राज्यात 20 जागांवर अटीतटीची लढाई –

पुणे शहरातील कोथरूड, हडपसर, शिवाजीनगर, कॅन्टोंमेंट तसेच अहमदनगर जिल्हयातील जामखेड आणि इतर ठिकाणी अशा एकुण 20 मतदार संघात भाजपच्या उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या 20 जागांवर अटीतटीची लढाई होणार असून सद्यस्थितीत विरोधत भाजपवर हावी असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. भाजप उमेदवारांनी सर्वांनाच गृहित धरल्यामुळे त्यांचा भ्रमनिरास होणार असल्याचे बोलले जात आहे. काही ठिकाणी तर विरोधकांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतल्याचे पहावयास मिळत आहे.

Visit : Policenama.com