‘दिलजमाई’ करण्याचे शरद पवारांचे प्रयत्न ‘अयशस्वी’ ! अखेर शिवेंद्रराजे भोसलेंचा ‘आमदार’कीचा राजीनामा, भाजपा प्रवेश ‘निश्‍चित’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सातारा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवेंद्रराजे भोसले हे भाजपामध्ये प्रवेश करणार हे आता निश्चित झाले आहे. शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मागील अनेक वर्षापासून शिवेंद्रराजे व सातारचे खासदार उदयनराजे यांच्यातील वाद विकोपाला गेले होते. त्यांच्यामध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. मात्र, आज शिवेंद्रराजे यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या ते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.

शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बगाडे यांच्याकडे सुपूर्द केला. शिवेंद्रराजे भोसले यांच्या राजीनाम्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. सातारा विधानसभा मतदार संघातून सलग तीन वेळा ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले आहेत. त्यामुळे सातारा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. त्यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे हे राजघराण्यातील भाऊ असले तरी ते एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. सातारा नगरपालिका निवडणुकीत दोघांमध्ये ठिणगी पडली. तेव्हापासून दोघांमध्ये वाद आणि एकमेकांना विरोध करण्यास सुरुवात झाली. नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवेंद्रराजे भोसले यांच्या पत्नीच्या विरोधात उदयनराजेंनी स्वतंत्र उमेदवार उभा केला. या निवडणुकीत राजा विरुद्ध प्रजा असा रंग चढला होता. अनेक मुद्यांवरुन दोघे एकमेकांसमोर आले होते.

सातारा जावली विधानसभा मतदारसंघाच्या भल्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी सातारा, जावळी तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्त्यांशी चर्चा करून भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मागील तीच ते चार दिवसांपासून अनेक घडामोडी झाल्या. आज सकाळी ते आपल्या काही कार्यकर्त्यासह मुंबईत दाखल झाले. त्यांनी विधानसभेचे सभापती हरिभाऊ बगाडे यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला.

राजीनामा दिल्यानंतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी गेले. उद्या सकाळी अकरा वाजता भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत बाजार समिती, खरेदीविक्री संघ आणि जिल्हा बँकेचे संचालकही भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे सातारा जावलीत राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –